ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 27 - उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या वेगवेगळ्या निर्णयामुळे चांगलेच चर्चेत आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या आणि छेडछाडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथांनी अँटी रोमियो स्क्वॉड स्थापन केला आहे. अँटी रोमियो स्क्वॉडवर उत्तर प्रदेशमधून टीका होत असताना माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही अँटी रोमियो पथकावर निशाणा साधला आहे.
'नशीब माझं लग्न आधीच झालं आहे, नाहीतर आदित्यनाथांनी माझंही लग्न होऊ दिलं नसतं,' असा टोला अखिलेश यांनी लगावला आहे. अखिलेश आणि त्यांची पत्नी खासदार डिंपल यादव यांचा प्रेमविवाह आहे. लग्नाआधीपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. अँटी रोमियो पथक ज्या पद्धतीने प्रेमीयुगुलांना लाठ्यांचा प्रसाद देते आहे, ते पाहता आमचे लग्न झाले नसते, असे अखिलेश म्हणाले.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या आणि छेडछाडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर असे पथक स्थापन करण्याचे आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यानुसार हे पथक स्थापन करण्यात आलं पण त्यानंतर काही प्रेमी युगुलांना या पथकाचा विनाकारण मार खावा लागला तर बहीण-भावालाही प्रेमी युगुल समजून या पथकाने त्रास दिल्याचं समोर आलं. त्यानंतर या पथकाचा विरोध वाढत आहे.
डिंपल आणि अखिलेशच्या लग्नाला अखिलेश यांचे वडील मुलायम सिंहांचा विरोध होता. नंतर अमरसिंहांनी मुलायम यांची समजून काढली आणि 1999 मध्ये अखिलेश-डिंपलचं लग्न झालं.