नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांनी हल्लीच एका ख्रिश्चन तरुणीशी लग्न केले. मात्र तेजस्वी यादव यांचे हे लग्न त्यांचे मामा साधू यादव यांना रुचलेले नाही. आता तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य हिने मामा साधू यादव यांच्याविरोधात मोर्चा उघडत त्यांची तुलना कंस मामाशी केली आहे. तसेच त्यांना नातं चालवायचं असेल तर कृष्ण बनण्याचा सल्ला दिला आहे.
याबाबत रोहिणी आचार्य म्हणाली की, कंस आजही समाजामध्ये उपस्थित आहे, ही गोष्ट सिद्ध झाली आहे. जर नातं चालवायचं असेल तर कृष्ण बना. दृष्ट कंसासारखे अन्यायी बनू नका, असा टोला रोहिणी हिने मामा साधू यादव यांना दिला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांनी राशेह हिच्यासोबत गुरुवार ९ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली होती. दरम्यान, लग्नाआधी राशेल हिचे नाव बदलून ते राजेश्वरी यादव करण्यात आले होते. ही बाब मामा साधू यादव यांना आवडली नाही. त्यानी यावर संतप्त प्रतिक्रिया देताना ही गोष्ट समाजाच्या माथ्यावर लागलेला कलंक आहे, अशी टीका केली.
साधू यादव शुक्रवारी म्हणाले होते की, तेजस्वीने ख्रिश्चन तरुणीसोबत लग्न करून समाजाच्या माथ्यावर कलंक लावण्याचे काम केले आहे. आमचा यदुवंशी समाज ही गोष्ट मान्य करणार नाही. तेजस्वीने सर्व बहिणींचा विवाह यादव समाजात केला. मात्र स्वत: ख्रिश्चन तरुणीशी लग्न केले. ज्याची परवानगी आमचा समाज देत नाही.
साधू यादव यांनी, तेजस्वीवर टीका करताना म्हटले होते. की, निवडणुकीमध्ये यादव समाजाने आरजेडीला मत द्यावे असे माझा भाचा तेजस्वी यादव याला वाटते. मात्र त्याला यादव समाजातील मुलीशी लग्न न करता या मुलीशी लग्न करायचे आहे. तेजस्वीने जे कृत्य केले आहे. त्यामुळे मला धक्का बसला आहे. मी माझ्या भाच्याला लग्नाच्या शुभेच्छा देणार नाही. साधू यादव यांनी तेजस्वीला विचारले की, त्यानेजे कुकर्म केले आहे, त्याला ते लपवत का आहेत. लालूंच्या कुटुंबाने हे लग्न का लपवून ठेवले आहे, असा सवालही त्यांनी विचारला आहे.