चंडीगड - कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली. त्यानंतर, माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनीही पंजाबचेमुख्यमंत्रीपद स्विकारण्यास स्पष्टच नकार दिला आहे. सोनिया गांधींनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती.
अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे. तसेच, पंजाबचा मुख्यमंत्री, पंजाब का मुखिया हा शीख व्यक्ती असला पाहिजे, असे माझे मत आहे. मी गेल्या 50 वर्षांपासून हेच म्हणते आहे. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाला नकार दिला असून आज संध्याकाळपर्यंत नाव निश्चित झालं पाहिजे, असेही अंबिका सोनी यांनी म्हटलं.
नवज्योतसिंग सिद्धूंच्या नावाला विरोध
अरमिंदर सिंग यांनी माजी क्रिकेटर आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. सिद्धू काहीही सांभाळू शकत नाहीत, मी त्यांना चांगलंच ओळखतो, ते राज्यासाठी धोकादायक ठरतील, असे सिंग यांनी म्हटले. कॅप्टन सिंग यांनी एनआयएला दिलेल्या मुलाखतीत नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर थेट प्रहार केला. नवज्योतसिंग सिद्धूला जर पंबाजच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवला, तर त्यास माझा विरोध राहिल. कारण, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, पाकिस्तानसोबत नवज्योत यांचे संबंध आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची सिद्धूशी खास मैत्री आहे, तर जनरल बाजवाही सिद्धूचे मित्र आहेत, अशी घणाघातील टीका कॅप्टन सिंग यांनी सिद्धूंवर केली आहे.
योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेईन
अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अवमान होत असल्याचे सांगितले. अमरिंदर सिंग म्हणाले, पक्षाला माझ्याबाबत शंका का होती. हे मला समजत नाही आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग पुढे म्हणाले की, असे वाटते की, पक्षाला माझ्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे मी सकाळीच ठरवले की, मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे. आता पक्षाला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला त्यांनी मुख्यमंत्रि बनवावे. आता भविष्यातील राजकारणाबाबत जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी निर्णय घेईन. सध्यातरी मी काँग्रेसमध्ये आहे. आता सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील वाटचालीबाबत निर्णय घेईन.