कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, विधानसभेचा कार्यकाळ संपायला आता अवघ्या काही महिन्यांचा अवधी उरला असताना अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिलं आहे.
न्यूज १८ इंडियाच्या एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिल्ली सरकारमधील मंत्री सांगितले की, यापूर्वी विधानसभा भंग करून आम आदमी पक्षाने एकदा चुक केली आहे. जर यावेळीही असं काही केलं असतं तर आम्ही सरकारपासून पळ काढत आहोत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला असता. त्यामुळे आम आदमी पक्षाने विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही सरकारपासून पळ काढलेला नाही. केजरीवाल आपल्या मुख्यमंत्रिपदाचा खुर्चीचा त्याग करत आहेत. जर जनतेने सांगितलं की आमचा मुलगा ईमानदार आहे, तर ते पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा खुर्चीवर बसतील, अन्यथा आपल्या घरी निघून जातील, असे सौरभ भारद्वाज म्हणाले.
तसेच राजीनामा द्यायचा होता तर राज्यापालांकडे द्यायला हवा होता. विधानसभा भंग करून निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, असा प्रश्न विचारला असता सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, कार रविवार होता आणि आज ईद आहे. उद्या आठवड्यातील पहिला सोमवार आहे, केजरीवाल उद्या राजीनामा देतील. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती.
दरम्यान, ४८ तासांमध्ये काही तरी लपवलं जात आहे. काही फाईल्स क्लिअर करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप भाजपाने केला होता. त्यावर सौरभ भारद्वाज म्हणाले की, तुम्ही विचार करा. कुठल्याही फाइलवर सही झाली तर ती गोपनीय राहणार नाही. सही झाल्यावर ती फाईल नायब राज्यपालांकडे जाईल. आणि सर्वांना समजेल. त्यामुळे ४८ तासांमध्ये काहीही होणार नाही. दोन वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात अपप्रचार करण्यात आला. त्यांनी एवढा पैसा कमावला, आमच्याकडे पुरावे आहेत, असे दावे केले गेले. तपास यंत्रणांच्या तपासाला दोन वर्षे होत आली. जर यांच्याकडे एवढेच पुरावे होते. तर २ वर्षांनंतरही ट्रायल सुरू का केली नाही, असा सवाल सौरभ भारद्वाज यांनी उपस्थित केला.