नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. आपला 50 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली असून दिल्लीत फिर एक बार केजरीवाल सरकार, स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे, अनेक राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या पराभवाचं कारण सांगितलं होतं. आता, खासदार गौतम गंभीरनेही आपले मत व्यक्त केलं आहे.
आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते, पण जनतेनं अरविंद केजरीवाल यांना कौल दिला. भाजपाला अजून मोठं काम करायचं आहे, अजून कष्ट घ्यायचंय. येणाऱ्या 5 वर्षात आम्ही लोकांपर्यंत पोहोचू, पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील विकास आणि दिल्लीला उत्कृष्ट शहर बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे गंभीरने म्हटले. तसेच, वीज मोफत, पाणी मोफत, मेट्रो मोफत यांमुळे जनता आम आदमी पक्षाच्या बाजुने झुकली. केजरीवाल यांनी निवडणुकांपूर्वीच मोफत सेवांची घोषणा केली. आता, या सेवा पुढील 5 वर्षांपर्यंत कायम ठेवाव्यात.
भारतीय जनता पक्ष दिल्लीतील नागरिकांना सक्षम बनवू इच्छित आहे, लाचार नाही. त्यामुळे, अरविंद केजरीवाल हेही या मताशी सहमत असतील, तेही दिल्लीला सक्षम बनवतील. दिल्लीला अजूनही मोठ्या प्रमाणात शाळा, विद्यापीठ आणि रुग्णालयांची गरज आहे. दिल्लीतील महिलांची सुरक्षा हाही मोठा विषय असल्याचं गंभीरने म्हटले. तर, अरविंद केजरीवाल यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या गंभीरने आहेत.
दरम्यान, दिल्लीत सत्तास्थापन करण्याइतके आम्हाला यश मिळाले नाही. मात्र 3 जागांवरून 18 ते 20 जागा आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तब्बल सहापटीने आम्ही पुढे गेलो आहेत. तसेच हे खरं आहे की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तोडीस-तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो असल्याची कबुली भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.