ग्वाल्हेर - ग्वाल्हेरमधील एका ब्राह्मण कुटुंबाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इस्लाम धर्माचा स्वीकार करण्याचा इशारा दिला आहे. या कुटुंबामध्ये एकूण २५ सदस्य आहेत. हे ब्राह्मण कुटुंब शेजाऱ्यांच्या जाचामुळे त्रस्त आहे. त्यामुळेच त्यांनी धर्मपरिवर्तन करून इस्लामचा स्वीकार करण्याची धमकी दिली आहे.
या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच पत्र लिहिली आहेत. ही पत्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ग्वाल्हेरमधील अपागंज परिसरात राहणारे हे ब्राह्मण कुटुंब शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबामुळे त्रस्त झालेले आहे. हे शेजारी आपल्याला एससी एसटी कायद्यामध्ये अडकवण्याची धमकी देतात, असा आरोप या कुटुंबाने केला आहे. त्यामुळे आपल्या धर्मपरिवर्तन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुस्लिम समाज आपली मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ग्वाल्हेरमधील आपागंज येथील पूजा विहार कॉलनीमध्ये शर्मा नावाचे एक कुटुंब राहते. या कुटुंबात एकूण २५ सदस्य आहेत. या कुटुंबातील प्रमुखाने आरोप केला की, शेजारी राहणाऱ्या उमरैया कुटुंबाने त्यांचे जगणे मुश्किल केले आहे. हे कुटुंब आपल्याशी सातत्याने वाद घातले. शिविगाळ करते तसेच एससी-एसटी कायद्यांतर्गत खोटी तक्रार करण्याची धमकीही देऊन त्रास देते. आमच्या कुटुंबातील २५ सदस्य सातत्याने भीतीच्या छायेत वावरतात, पोलिसांमध्ये तक्रार केली तरी सुनावणी होत नाही, असा आरोप या कुटुंबातील प्रमुखांनी केला.
दरम्यान, रोजच्या कटकटीला कंटाळून शर्मा कुटुंबाने ९ जुलै रोजी या प्रकाराची तक्रार थेट पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे केली. यामध्ये कुटुंबातील २५ सदस्यांसह हिंदू धर्माचा त्याग करून इस्लामचा स्वीकार करण्याचा इशाराही दिला. तसेच कुटुंब प्रमुखाने ग्वाल्हेरचे डीएम कौशलेंद्र विक्रम सिंह, एसपी अमित सांघी यांनाही इशारा देणारे पत्रक दिले.
दरम्यान, धर्मपरिवर्तन करण्याचा इशारा देणारे पत्रक व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली. पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या प्रमुखांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. तसेच कुठल्याही चौकशी शिवाय पोलीस गुन्हा दाखल करून घेणार नाही, असे आश्वासनही त्यांना दिले. या प्रकरणी दोन्ही पक्षांना बोलावून त्यांना समज देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र धर्मपरिवर्तनाचा इशारा देणारे पत्र आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.