मुंबई - आंध्र प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे रेनूगुंठा येथील तिरुपतीविमानतळावर धरणे आंदोलनाला बसले आहेत. शहरातील प्रवेशामुळे पोलीस त्यांना ताब्यात घेऊ इच्छित होती. मात्र, चंद्राबाबूंनी विमानतळावरच बैठक मारली. यावेळी, पोलीस अधिकाऱ्यांसमवेत त्यांची बाचाबाचीही झाली. तिरुपती आणि चित्तूरला जाण्यासाठी ते निघाले होते.
चंद्राबाबू नायडू हे हैदराबाद विमानतळावरुन तिरुपती येथे पोहोचले. मात्र, तेथे गेल्यानंतर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी तरुपतीच्या मंदिरात जाण्यास परवानगी नकार देत, त्यांना अडवले. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते मंदिराकडे जात होते. मात्र, पोलिसांनी विमानतळावरुनच त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, त्यांनी विमानतळावरच धरणे आंदोलन सुरू केले. स्थानिक निवडणुकांमुळे गावात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून कोरोना महामारीच्या निर्बंधामुळेही चंद्राबाबू यांना अडविण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
तिरुपती येथील महापालिका निवडणुकांसाठी तेलगू देसम पार्टीच्या एका नेत्याच्या पत्नीला निवडणुकांत उमेदवारी दिली आहे. या उमेदवार महिलेच्या पतीचं चहाचं दुकान असून स्थानिक अधिकाऱ्यांनी या दुकानाची तोडफोड केली होती. त्यानंतर, स्थानिक अधिकाऱ्यांच्या विरोधात धरणे आंदोलनाचा निर्णय या नेत्याने घेतला होता, त्यासाठी चंद्राबाबू नायडूंनी हजेरी लावली होती. मात्र, या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नसल्याने स्थानिक पोलिसांनी चंद्राबाबू यांना विमानतळावरच ताब्यात घेतले. दरम्यान, नायडू यांनी नाराजी व्यक्त करत मी गेल्या 14 वर्षे या राज्याचा मुख्यमंत्री राहिलो असून सध्या विपक्ष नेता आहे, तरीही मला जिल्हाधिकारी यांना का भेटू दिलं जात नाही, असा प्रश्न विचारला.