नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला असून, त्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था, शेजारील राष्ट्रांशी संबंध आणि परराष्ट्र धोरणाबाबत राहुल गांधी यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून, चीनने घुसखोरी करण्यासाठी नेमकी हीच वेळ का निवडली, असा सवाल उपस्थित केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, अशी वेळ का आली आहे, ज्यामुळे आपण भारताविरोधात पाऊल उचलू शकतो, असा चीनच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. ही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. देशाचे संरक्षण हे मुख्यत्वेकरून परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था आणि जनतेच्या विश्वासावर अवलंबून असते. मात्र गेल्या सहा वर्षांत आपला देश या सर्व बाबतीत अपयशी ठरला आहे.
देशाच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, पूर्वी अमेरिका, रशिया, युरोपसह जवळपास सर्वच देशांसोबत आपले संबंध चांगले होते. मात्र आता आपले संबंध केवळ व्यापारापुरते उरले आहेत. रशिसासोबतचे आपले संबंध बिघडले आहेत. पूर्वी नेपाळ, भूतान, श्रीलंका हे आपले मित्र होते. पाकिस्तान वगळता इतर सर्व शेजारी आमच्यासोबत काम करत होते. मात्र सध्या प्रत्येकजण आमच्याविरोधात बोलत आहे.
एकेकाळी अर्थव्यवस्था ही आमची ताकद होती. मात्र आज देशातील बेरोजगारी शिखरावर पोहोचली आहे. लहान व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत. मात्र सरकार आमचे म्हणणे ऐकून घेत नाही आहे. जर तुम्ही देश म्हणून विचार करत असाल तर प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. जर अर्थव्यवस्थेत पैसे ओतले गेले नाहीत तर सर्व काही बरबाद होईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.