...म्हणून ‘आप’ला दिल्लीमध्ये लोकसभेची एकही जागा देण्यास इच्छूक नाही काँग्रेस, असं आहे राजकीय गणित 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 06:34 PM2023-08-17T18:34:43+5:302023-08-17T18:34:43+5:30

Congress Vs AAP : एकीकडे मोदी आणि भाजपाला देशव्यापी आव्हान देण्याची तयारी सुरू असताना दिल्लीमध्ये मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये खटके उडताना दिसत आहे.

...So Congress is not willing to give a single Lok Sabha seat to 'AAP' in Delhi, this is the political math. | ...म्हणून ‘आप’ला दिल्लीमध्ये लोकसभेची एकही जागा देण्यास इच्छूक नाही काँग्रेस, असं आहे राजकीय गणित 

...म्हणून ‘आप’ला दिल्लीमध्ये लोकसभेची एकही जागा देण्यास इच्छूक नाही काँग्रेस, असं आहे राजकीय गणित 

googlenewsNext

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी इंडिया आघाडीची उभारणी विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान, एकीकडे मोदी आणि भाजपाला देशव्यापी आव्हान देण्याची तयारी सुरू असताना दिल्लीमध्ये मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये खटके उडताना दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी केलेल्या एका विधानानंतर विरोधी आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

दरम्यान, दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले आहेत. अलका लांबा यांचा जागांबाबतचा दावा दीपक बाबरिया यांनी फेटाळला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी पक्ष संघटनेला मजबूत करून एकजूट होऊन निवडणूक लढवणार, आम्ही आपसोबत आघाडीसाठी कुठलीही चर्चा केलेली नाही, असं सांगितलं. संदीप दीक्षित आणि अजय माकन या दिल्लीतील नेत्यांनी आपला विरोधी आघाडीमध्ये घेण्यास आधीच विरोध केला होता. अशा परिस्थितिमध्ये दिल्लीतील काँग्रेसचे नेते आम आदमी पक्षाला लोकसभेची एकही जागा देऊ इच्छित नाहीत. यामागे एक निश्चित असं राजकीय गणित आहे. ते पुढीलप्रमाणे.

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे. एमसीडीच्या सत्तेवरही आम आदमी पक्षाचा कब्जा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र नेमकं याच्या उलट आहे. २०१९ मध्ये लोकसभेच्या दिल्लीतील सातही जागा भाजपाने जिंकल्या होत्या. मात्र बहुतांश ठिकाणी त्यांची लढत ही काँग्रेससोबतच झाली होती. दिल्लीतील सात पैकी पाच ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर होती. तर दोन ठिकाणी आम आदमी पक्ष दुसऱ्या स्थानी होता.

गेल्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास काँग्रेस आपपेक्षा पुढे होती. आपला दिल्लीच्या ७ लोकसभा मतदार संघांमध्ये मिळून १५ लाख ७१ हजार ६८७ मते मिळाली होती. तर काँग्रेसला १९ लाख ५३ बजार ९०० मते मिळाली होती. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी २२.६ टक्के होती. तर आपला १८.२ टक्के मतं मिळाली होती.  

गेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर दिल्लीतील काँग्रेसचे नेते सर्व सात जागांवर दावेदारी करत आहेत. गेल्या निवडणुकीत जेवढ्या ठिकाणी उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले तेवढ्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. मात्र दिल्लीत राजकीय परिस्थिती पाहता आम आदमी पक्ष काँग्रेसला तेवढ्या जागा देण्यास तयार होणे कठीण आहे.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीला आधार बनवून लोकसभेच्या अधिकाधिका जागा लढवण्याचा आपचा मानस आहे. एकंदरीत दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस आघाडीमध्ये निर्माण झालेला पेच हा जागांच्या वाटपाचा नाही तर एकमेकांचा राजकीय आधार वाचवण्याचा आहे. 

Web Title: ...So Congress is not willing to give a single Lok Sabha seat to 'AAP' in Delhi, this is the political math.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.