"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 07:20 PM2024-05-02T19:20:27+5:302024-05-02T19:21:10+5:30
“मला वाटते की, एवढ्या जुन्या पक्षाने, आपला जाहीरनामा अल्पसंख्याक आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून आउटसोर्स केला आहे.”
भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या, 'संपत्तीच्या पुनर्वितरणा' संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेसवर थेट हल्ला चढवला आहे. याशिवाय त्यांनी, जात निहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधींवरही निशाणा साधला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करताना म्हणाले की, काँग्रेस सत्तेवर आल्यास, सर्वांची संपत्ती तपासली जाईल, तिचे पुनर्वितरण केले जाईल आणि ती मुस्लीम तसेच घुसखोरांना दिली जाईल. हा मुद्दा कुठून आला? असा प्रश्न अमित शाह यांना विचारला असता, त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तत्कालीन वक्तव्याची आठवण करून दिली...
अमित शाह म्हणाले, “हे देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वक्तव्य आहे. मोठे प्रसिद्ध वक्तव्य होते, की या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यकांचा आणि अल्पसंख्यकांमध्येही मुस्लिमांचा आहे. आता जेव्हा संपत्तीच्या वितरणाचा मुद्दा येतो, तेव्हा ती संसाधनांच्या माध्यमातूनच होईल. सरकार लोकांची संपत्ती घेऊन वितरित करेल आणि मी म्हणतो, जर हे सत्त नसेल, तर काँग्रेस पक्षाने सांगावे की याचा अर्थ काय?” शाह नेटवर्क18 सोबत एका मुलाखतीत बोलत होते.
यानंतर, जर काँग्रेसचे सरकार आल्यास, एक देशव्यापी एक्स-रे केला जाईल, यात जनतेच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन कोणत्या वर्गाकडे, कोणत्या जातीकडे किती संपत्ती आहे? इंस्टीट्यूशन्समध्ये किती वाटा आहे? त्या हिशेबाने संपत्तीचे पुनर्वितरण केले जाईल? अशा आशयाच्या राहुल गांधी यांच्या विधानासंदर्भात विचारले असता, "तर यानुसार मालमत्तेच्या पुनर्वितरणात त्यांचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे," असे उत्तर अमित शाह यांनी दिले.
यावर, शाह यांना विचारण्यात आले की, ते (राहुल गांधी) म्हणतात, असमानता संपवण्याच हाच मार्ग आहे? याला उत्तर देताना शाह म्हणाले, “ती त्यांची समज आहे. मला वाटते की, एवढ्या जुन्या पक्षाने, आपला जाहीरनामा अल्पसंख्याक आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून आउटसोर्स केला आहे.”