नवी दिल्ली, दि. 24 - संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाची चहुबाजूंनी प्रशंसा होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही सुषमा यांनी भाषणात केलेल्या आयआयटी आणि आयआयएमच्या उल्लेखावर तिरकस कटाक्ष टाकत त्यांचे कौतुक केले आहे. सुषमांनी काँग्रेसच्या दुरदृष्टीला मान्यता दिल्याबद्दल राहुल यांनी त्यांचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानची कोंडी केली. तसेच पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पाढा वाचत दहशतवादाला आळा घालण्याचे आवाहन केले. यावेळी सुषमा स्वराज यांनी भारतातील आयआयटी आणि आयआयएमचा उल्लेख करत भारताने प्रगतीचा तर पाकिस्तानने दहशतवादी तळ उभारण्याचा मार्ग पत्करल्याचा टोला लगावला. सुषमा यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणले, सुषमाजी, आयआयटी आणि आयआयएम स्थापन करण्याच्या काँग्रेस सरकारांच्या दुरदृष्टी आणि वारशाला मान्यता देण्यासाठी धन्यवाद! राहुल गांधीच्या या ट्विटचे अनेक नेटिझन्स समर्थन करत आहेत. तर काही जण त्यावर टीकाही करत आहेत. आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काल पाकिस्तानला सुनावले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता असा टोला लगावला. आम्ही गरिबीशी लढत आहोत, पण पाकिस्तान आमच्याशी लढत आहे असं सांगत सुषमा स्वराजांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांचं भाषण सुरु असताना प्रत्येकजण 'कोण बोलतंय ते पहा' (Look who is talking) असं बोलत होतं असा टोलाही लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सर्व होऊनही शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झालं ते सर्वांना माहित आहे अशी आठवण त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. सोबतच पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचं नाटक करत असतात अशी टीका केली. 'भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाला, पण कधी तुम्ही एकत्र बसून विचार केला आहे का ? भारताने इतकी प्रगती केली पण दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? असा सवाल सुषमा स्वराजांनी विचारला. जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल असा सल्लाच सुषमा स्वराजांनी देऊन टाकला. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद ही आपली प्रमुख समस्या आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपण एकजूट झालो पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने दहशतवादाकडे पाहणं थांबवलं पाहिजे असं आवाहनही केले होते.
म्हणून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मानले परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 12:49 PM