नरेश डोंगरे ।
नागपूर : हाथरस बलात्कार आणि हत्याकांडामुळे पुन्हा एकदा देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवू, दोषींना कठोरात कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा केली जाईल, अशी घोषणा होईल. प्रत्यक्षात पीडित परिवाराला तातडीने न्याय मिळणार नाही. होय, ही सर्वसामान्यांची भावनाच नाही तर यापूर्वीच्या अशाच घटनांतून आलेला कटू अनुभव आहे.
हाथरस प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. यापूर्वी हैदराबाद, दिल्लीच्या निर्भया प्रकरणानेही तसेच नागपुरात मोनिका किरणापुरे, कांचन मेश्राम, सानिका थुगावकर तर हिंगणघाट (वर्धा) मध्ये अंकिता जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळली होती. प्रत्येक वेळी उफाळून आलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी ‘या प्रकरणाचा’ तातडीने निकाल लावू, आरोपींना फासावर लटकवू, अशी भाषा वापरण्यात येते. प्रत्यक्षात असे काहीही होत नाही. राजकीय घोषणांच्या पुरात पीडित परिवाराचे अश्रू वाहून जातात. कोर्टकचेऱ्यामध्ये तारखांच्या बांधावर न्याय अडकतो. त्यामुळेच गुंड निर्ढावतात.१ जुलै २०१८ च्या रात्री आरोपी हेमनानीने सानिका थुगावकरला ‘तू माझ्याशी संबंध का तोडले’ असा प्रश्न करीत चाकूचे सपासप वार करून संपविले होते. आता या प्रकरणाला अडीच वर्षे झाली. अद्याप आरोपीला शिक्षा झालेली नाही. १८ डिसेंबर २००५ ला लोणारा कळमेश्वरच्या कांचन मेश्रामला राकेश कांबळे आणि अमरसिंग ठाकूर या गुंडांनी उचलून नेले. संपूर्ण गाव जमा झाले असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिची शस्त्राने भोसकून हत्या केली. न्यायालयाने जून २०१३ मध्ये त्यांना फाशीची सुनावली. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.३० दिवसांत न्याय?हिंगणघाटच्या अंकिता पिसुड्डे या प्राध्यापिकेला ३ फेब्रुवारी २०२० ला नराधम विकेश नगराळे याने जिवंत पेटवले. या जळीतकांडाने देशभर संतापाची लाट उसळली होती. संतप्त लोकभावना लक्षात घेत राज्य सरकारने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायद्याचा अभ्यास करून प्रकरणाचा ३० दिवसांत निकाल लावू, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवू, असे म्हटले होते. दोषारोपपत्र दाखल होऊन १८० दिवस झाले, परंतु सुनावणीही सुरू झालेली नाही.