आरबीआयने केलेल्या पेटीएमवरील कारवाईवरून ऱाष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत नोटाबंदीचा विषय काढला. नोटाबंदीनंतर जर पेटीएमधून अफरातफर केली जात होती तर सरकारने काय पाऊले उचलली आहेत. एवढी वर्षे सरकार काय करत होते, असा सवाल सुळे यांनी केला आहे.
केंद्रीय एजन्सी छापेमारीत जे पैसे जप्त करत आहे त्याचा स्त्रोत काय आहे. जेव्हा मोदी सरकारने नोटाबंदी केली तेव्हा सर्वाधिक जाहिराती या पेटीएमच्या होत्या. आज पेटीएमविरोधात सर्वाधिक लढा कोण देत आहे? आता सरकारच सांगतेय की सर्वाधिक अफरातफरीचे व्यवहार हे पेटीएमद्वारे करण्यात आले आहेत. मग एवढी वर्षे सरकार काय करत होती, असा सवाल सुळे यांनी केला आहे. मग नोटाबंदी चुकीची होती की पेटीएम चुकीचे होते की तंत्रज्ञान चुकीचे होते, असा बोचरा सवाल सुळे यांनी संसदेत उपस्थित केला आहे.
हे पैसे चलनात कुठून आले? जर नोटाबंदी केली गेली होती तर एवढी रक्कम कुठून आली. जी आता तुम्ही निवडक पद्धतीने पकडत आहात. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल, असे सुळे म्हणाल्या.
संसदेत तृणमूल-भाजपमध्ये वाद...तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार सौगता रॉय आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात सभागृहात वाद झाला. पीएम मोदींच्या काही उद्योगपतींशी असलेल्या घनिष्ट संबंधांवरून हा वाद झाला. भारतीय बाजारातील तेजीचा सर्वाधिक फायदा राजकारणातील अंतर्गत लोकांना झाला, असा आरोप रॉय यांनी केला. त्याचवेळी दुबे यांनी टीएमसी खासदारावरच काही उद्योगपतींशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप असल्याचे म्हटले.