... म्हणून लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गेलो नाही; काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 12:00 PM2023-08-15T12:00:15+5:302023-08-15T12:12:15+5:30
मल्लिकार्जुन खर्गेंनी आपल्या अनुपस्थितीचे कारण देत पंतप्रधान मोदींच्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिवस आज लाल किल्ल्यावर मोठ्या थाटात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहाव्यांदा देशवासीयांना संबोधित केले. आपल्या ९० मिनिटां भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षांतील यश आणि देशाचे पुढील मार्गक्रमण आदी गोष्टींवर भाष्य केले. तसेच, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख करत नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी मोदींनी आगामी लोकसभा निवडणुकीचीही बिजे रोवली. तर, पुढच्या वर्षीही १५ ऑगस्टला आपणच झेंडावंदन करू, असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याला विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. आता, मल्लिकार्जुन खर्गेंनी आपल्या अनुपस्थितीचे कारण देत पंतप्रधान मोदींच्या भाषणावरही प्रतिक्रिया दिली आहे.
मोदींनी आपल्या भाषणात तीन कमिटमेंट सांगितल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणावर भाष्य करत विरोधकांवर शरसंधान साधले. तीस वर्षांनी देशाला बहुमताचे, ताकदवर सरकार हवे असे जनतेला वाटले होते. आज देशात तीन दशकांनी ताकदवर सरकार आले आहे. तेच देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकते, असेही मोदींनी यावेळी म्हटले. या सोहळ्याला देशाचे सरन्यायाधीश उपस्थित होते. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची खुर्ची खाली होती. त्यामुळे, त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर खर्गेंनी गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले.
पहिलं तर, माझ्या डोळ्याला दिसण्यासंबंधित थोडा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला ९.२० वाजता माझ्या घरी आणि नंतर काँग्रेस मुख्यालयावरही तिरंगा ध्वज फडकवायचा होता. लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था एवढी कडक आहे की, पंतप्रधान गेल्याशिवाय तिथून दुसऱ्या कोणालाही जाऊ दिलं जात नाही. त्यामुळे, कदाचित मी येथे वेळेत पोहोचू शकलो नसतो. म्हणून सुरक्षा यंत्रणेची स्थिती आणि वेळेची कमतरता लक्षात घेऊन मी तिथं न जाण्याचं ठरवलं, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं.
#WATCH पहली बात मुझे आंखों से संबंधित को समस्या है। दूसरी बात मुझे अपने आवास पर 9:20 को और कांग्रेस मुख्यालय में भी तिरंगा फहराना था। सुरक्षा इतनी कड़ी है कि वे प्रधानमंत्री के जाने से पहले किसी और को जाने नहीं दिया जाता... मुझे लगा कि मैं यहां समय पर नहीं पहुंच पाऊंगा... समय को… pic.twitter.com/6SmkNH39L9
— ANI_HindiNews (@AHindinews) August 15, 2023
खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरही टीका केली. पुढच्यावर्षी पुन्हा एकदा आपणच झेंडा फडकवू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. त्यावर, पलटवार करताना खर्गेंनी मोदींना टोला लगावला. पुढच्यावर्षी १५ ऑगस्टला ते झेंडावंदन करतील, पण त्यांच्या घरी, असे म्हणत खर्गे यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.
#WATCH वे(प्रधानमंत्री) अगले साल एक बार फिर राष्ट्रीय ध्वज फहराएंगे लेकिन अपने घर पर फहराएंगे: पीएम मोदी के अगले वर्ष 15 अगस्त को इसी लाल किले से देश की उपलब्धियां आपके सामने रखने वाले बयान पर कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे pic.twitter.com/e1MSzKGQSX— ANI_HindiNews (@AHindinews) August 15, 2023