ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - 500 आणि 1000च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे बँकेच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. या रांगांमध्येच अनेकांचा जीव जातो आहे. आतापर्यंत नोटबंदीच्या निर्णयामुळे 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. त्यातील अनेकांनी या निर्णयानंतर आत्महत्येचा मार्ग पत्करलाय. तर काहींना निर्णयाचा धक्का बसल्यानं मृत्यू झाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानं धक्का बसलेल्यांचं मृत्यूसत्र अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आज दिवसभरात पिंपरीतील राजगुरूनगरमध्ये एसबीआय बँकेच्या शाखेतील एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. तर भाईंदरमध्ये नोटा बदलण्याच्या रांगेत दीपक शाह या वृद्ध इसमाचा मृत्यू ओढावला आहे. तर सोलापुरातही स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या सात दिवसांत जवळपास 35 लोकांचा मृत्यू ओढावला आहे. याआधी उत्तर प्रदेशमध्ये ५५ वर्षीय शेतक-याने आत्महत्या केली आहे. नोटाबंदीमुळे मुलीच्या लग्नासाठी बँकेतून पैसे काढता येत नसल्याने देवराज सिंह यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. तर नांदेडमध्ये बँकेच्या रांगेत असताना एका वृद्धाचा मृत्यू झाला. आठ दिवसानंतरही बँकेसमोरील गर्दी कमी होताना दिसत नाही आहे. रांगेत सकाळी लवकर येऊन उभे राहिलेल्या नागरिकांचा दुपारपर्यंत नंबर येत नसल्याची तक्रार असून, बँक कर्मचारीही ग्राहकांशी योग्यरीतीनं वागत नाहीत. त्यामुळे अनेकदा वादाला निमंत्रण मिळत आहे. घरी लग्नसमारंभ असलेल्यांची मोठी अडचण होत असतानाच पैशांअभावी अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.