ऑनलाइन लोकमत
श्रीनगर,दि. 19 - अमरनाथ यात्रा पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवरच मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलीस अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, पवित्र अमरनाथ गुहेतील हिम शिवलिंगाचे दर्शन घेऊन पहलगाममधील नुनवान बेसकॅम्प येथे परतत असताना मंगळवारी संध्याकाळी रोमेश्वर पाटीदार यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पाटीदार यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास केला जात आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 दिवस चालणा-या अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत एकूण 48 भाविकांचा मृत्यू झाला आहे. यासोबत नैसर्गिक कारणांमुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आठ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 20 भाविकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे राज्यापाल एन.एन.व्होरा यांनी 29 जूनपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेमध्ये आतापर्यंत मृत पावलेल्या व जखमी झालेल्या भाविकांसंबंधित मिळालेल्या माहितीची मंगळवारी पुन्हा एकडा पडताळणी केली.
दरम्यान, अमरनाथजी श्राइन बोर्डचे सीईओ उमंग नरुला यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेदरम्यान मृत पावलेल्या भाविकांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी अमरनाथजी श्राइन बोर्डनं आतापर्यंत 14.66 लाख रुपये व 1.34 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
आणखी बातम्या वाचा
अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांची बस रविवारी (16 जुलै ) दुपारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर नचलानात (जिल्हा रामबन) खोल दरीत पडून, दोन महिलांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. मृत भाविक उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील आहेत. ही बस जम्मू-काश्मीर परिवहन महामंडळाची होती. जम्मू येथून ३,६०३ यात्रेकरूंना घेऊन निघालेल्या ताफ्यात ही बस होती.