पाटणा, दि. 15 - बिहारमधील पुरस्थितीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढता असून, या महापुरामुळे आत्तापर्यंत 56 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार अररिया येथे 20, किशनगंजमध्ये 8, पूर्व चंपारण्य जिल्ह्यात 3, पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात 9, दरभंगा जिल्ह्यात 3, मधुबनी जिल्ह्यात 3 सीतामढी येथे 5, माधेपुरा येथे 4 आणि शिवहर येथे एकाचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या आपातकालिन व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त सचिव अनिरुद्ध कुमार यांनी ही माहिती दिली आहे. बिहारमधील पूरस्थितीमुळे झालेल्या हानीची आज आपातकालिन विभागाचे अतिरिक्त सचिव अनिरुद्ध कुमार म्हणाले, "पूरस्थितीमुळे बिहारमध्ये आत्तापर्यंत 56 जणांचा मृत्यू झाला आहे. अररिया येथे 20, किशनगंजमध्ये 8, पूर्व चंपारण्य जिल्ह्यात 3, पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात 9, दरभंगा जिल्ह्यात 3, मधुबनी जिल्ह्यात 3 सीतामढी येथे 5, माधेपुरा येथे 4 आणि शिवहर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे." नेपाळमधील मैदानी भाग आणि सीमांचलमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे पूर्णिया किशनगंज, कटिहार, अररिया, दरभंगासह एकूण १८ जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. या जिल्ह्यांमधील दूर्गम भागात वसलेल्या गावांमध्ये परिस्थिती अधिकच खराब झाली आहे. तसेच परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. या पुरस्थितीमुळे सुमारे एक कोटी नागरिकांना फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहार आणि नेपाळच्या सीमेलगतच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच नेपाळकडून धरणांमधील पाणी सोडण्यात येत असल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे .
महापुरामुळे बिहारमध्ये आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 5:39 PM