नवी दिल्ली : ‘इंडिया’ एकसंध ठेवण्यासाठी व भाजपचा पराभव करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून या निवडणुकीत पक्षाने कमी जागांवर लढण्याचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला. हा निर्णय पक्षाचा कमी आत्मविश्वास नव्हे तर देशाच्या विविध भागांमध्ये प्रभाव असलेल्या इतर पक्षांना जिंकण्यासाठी पुरेशी संधी देण्यासाठी होता, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. काँग्रेस राम मंदिरावर बुलडोझर फिरवेल हा पंतप्रधानांचा आरोप पूर्णपणे खोटा आहे, असेही खरगे म्हणाले.
दोन पक्ष भक्कम म्हणून...- काँग्रेस ३२८ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर इतर २०० जागा इतर पक्षांसाठी सोडल्या आहेत. केरळ, बंगाल आणि पंजाबमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत, यावर ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या विरोधात लढण्यात कोणतेही मतभेद नाहीत. - आम्ही राज्यांमध्ये दोन पक्ष भक्कम असल्याने लढत आहोत. जर लढलो नाही तर भाजपला फायदा होईल.