...म्हणून उभारावा लागला बंडाचा झेंडा, सचिन पायलट यांनी सांगितलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 02:54 PM2020-08-11T14:54:51+5:302020-08-11T14:56:57+5:30
काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी केलेल्या मनधरणीनंतर राजस्थानमधील युवा नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोह यांच्याविरोधात केलेले बंड मागे घेतले आहे.
नवी दिल्ली/जयपूर - गेल्या महिनाभरापासून राजस्थानमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी केलेल्या मनधरणीनंतर राजस्थानमधील युवा नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोह यांच्याविरोधात केलेले बंड मागे घेतले आहे. दरम्यान, राजस्थानमधील आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात बंड करण्यामागचं कारण सचिन पायलट यांनी आता सांगितले आहे.
''मी कधीही कुठल्याही पदाबाबत बोललो नाही. मी कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. मात्र आत्मसन्मानासाठी ही लढाई सुरू होती. माझ्या मनात कुठल्याही व्यक्तीबाबत द्वेषभावना नाही. आता पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी सांभाळेन,'' असे सचिन पायलट यांनी सांगितले. राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आल्यानंतर आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन पायलट यांनी सांगितले.
या मुलाखतीत पायलट म्हणाले की, आधी काय झालं आणि पुढे काय होईल, याबाबत मी काही सांगू शकत नाही. माझ्यासाठी काही अशा शब्दांचा वापर केला गेला. ज्यामुळे मला वाईट वाटले. मात्र मी हा कडवट घोट प्राशन केला आहे. राजकारणामध्ये शब्दांचा जपून वापर केले गेला पाहिजे. कारण जनता आपले म्हणणे ऐकत असते. जेव्हा मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. तेव्हा माझ्यात सगळे गुण होते. मात्र आता मी निरुपयोगी झालोय, अशा शब्दात पायलट यांनी गहलोत यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली.
राजस्थानमध्ये जेव्हा पक्ष २१ जागांवर गुंडाळला गेला होता. तेव्हा मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनलो आणि पक्षाला आम्ही सत्तेपर्यंत घेऊन गेलो. मी लोकांना जोडून चालणारा माणूस आहे. पक्षात फूट पाडणे हा माझा स्वभाव नाही, तसेच मी कुठल्याही प्रकारच अहंकारही बाळगत नाही. जे आमदारा पक्षासाठी तुरुंगात गेले. ते बंडखोरी कशी काय करू शकतात. जे इंदिरा गांधींसोबत काम करू आणि लाठ्याकाठ्या झेलून इथपर्यंत आले आहेत, ते बंडखोर कसे झाले, असा सवालही पायलट यांनी उपस्थित केला.
मला पक्षाने खूप पदं दिली. मात्र याचा अर्थ मी गप्प बसावं असा होत नाही. जे योग्य वाटेल ते मी बोलत राहीन. तुम्ही कुणाला पद द्याल, सोबत मान-सन्मान नसेल. मी केवळ घर आणि गाडी कमावण्यासाठी पद मिळवणाऱ्यांमधील नाही आहे. ज्यांच्या खांद्यावर चढून आम्ही सरकारमध्ये आलो आहोत, त्यांचा मान राखला गेला पाहिजे, तसेच त्यांची कामं झाली पाहिजेत, असेही पायलट यांनी सांगितले.