पाटणा - केंद्रीयगृहमंत्री अमित शहा आज बिहार दौऱ्यावर असून बिहारमधील जनतेला संबोधित करताना त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या दंगलीच्या घटनांचा उल्लेख केला. ज्याप्रमाणे येथील सभेला गर्दी जमलीय, त्यानुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपलाच यश मिळेल हे सिद्ध होतंय, असं अमित शहांनी म्हटलं. ज्या सरकारमध्ये जंगलराजचा निर्माता आरजेडी सहभागी आहे, त्या राज्यातील सरकारमध्ये शांतता स्थापन होऊ शकत नाही. तर, नितीश कुमार यांच्यासाठी आता भाजपचे दरवाजे कायमस्वरुपी बंद झाले आहेत.
नवादा जिल्ह्यातील हिसुआ शहरातील इंटर विद्यालयात आयोजित जनसभेला संबोधित करताना अमित शहा यांनी बिहार सरकारमधील राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला. तसेच, भाजपकडे सत्ता देण्याचं आवाहनही केलं. देशात पुढील वर्षी म्हणजेच २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवेळी बिहारमध्ये सर्वच्या सर्व ४० जागांवर भाजपच्या उमेदवारांना निवडणूक द्या, त्यानंतर, २०२५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून द्या. त्यानंतर, बिहारमध्ये दंगलखोरांना उलटं लटकवून सरळ करण्याचं काम करू, अशा शब्दात अमित शहांनी बिहारमधील जनतेला आवाहन केलंय.
दरम्यान, अमित शहा बिहारसाठी जास्त सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. कारण, गेल्या ६ महिन्यात त्यांचा हा ५ वा बिहार दौरा आहे. बिहार दौऱ्यातील पहिल्याच दिवशी शहा यांनी पाटणा येथील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपला सर्वाधिक जागा कशा निवडून आणता येतील, यावर या चर्चेत मंथन झाल्याचं समजते.