थिरूअनंतपुरम - केरळमध्ये एका 28 वर्षीय हिंदू महिलेला 22 दिवसांसाठी कैद करून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एका योग केंद्रामध्ये 22 दिवसांसाठी कैद केलं होतं असं या महिलेने म्हटलं आहे. ख्रिश्चन पतीला सोडण्याचा तिच्यावर दबाव टाकला जात होता आणि यासाठीच तिला कैद करण्यात आलं होतं असं तिने म्हटलं आहे.
योग केंद्रात शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत होते. वेगळ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न करायची तयारी असलेल्या जवळपास 60 महिलांना योग केंद्रामध्ये अजूनही कैद करून ठेवण्यात आलं आहे असं तिने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार श्वेता नावाची ही महिला डॉक्टर आहे. योगकेंद्रतानून पळ काढल्यानंतर तिने केरळ उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
योग केंद्राचे सर्व नियम पाळण्याचं मी नाटक केलं, त्यामुळे माझ्यावर पाळत ठेवण्याचं प्रमाण कमी झालं आणि शक्कल लढवून तेथून पळ काढण्यात मी यशस्वी झाली. जीवाला धोका असल्याने श्वेताने उच्च न्यायालयात पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
श्वेता आणि रिंट आइझेक यांनी एका मंदिरात लग्न केलं आणि विवाहाची नोंदणी देखील केली होती. आइझेकसोबत दहा महिन्यांपासून ती राहात होती. पण कुटुंबियांनी योग केंद्रात जावून “परामर्श” करण्यासाठी बळजबरी केली आणि ती तेथे गेली.
योग केंद्रात नेहमी हात बांधून ठेवले जायचे. बायबल आणि कुरानबाबत वाईट गोष्टी येथे सांगितल्या जायच्या. योग केंद्रात जमिनीवर झोपायला लागायचं, तिथलं शौचालयाचा दरवाजाही बंद होत नव्हता. तिथे अनेक तरूणींना अनेक वर्षांपासून कैद करून ठेवण्यात आलं असून त्यातल्या अनेक तरूणी आजारी आहेत, असं श्वेताने सांगितलं. योग केंद्रात कैद असलेल्या महिलांवर लैंगिक अत्याचारही होतात असा आरोप श्वेताने प्रतिज्ञापत्रात केला आहे. श्वेताने ज्या योग केंद्राविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे ते बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. उदयमपरूर पोलिसांनी योग केंद्रातून श्रीजेश नावाच्या एका व्यक्तीला सोमवारी अटक केली आहे. तर केंद्राचा प्रमुख मनोज उर्फ गुरूजी आणि अन्य तीन योग शिक्षक फरार आहेत.