भोपाळ - मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणिपोटनिवडणुकीतील उमेदवार इमरती देवी यांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आयटम असा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे. कमलनाथ यांच्या विधानावरून संपूर्ण भाजपा कमलनाथ आणि काँग्रेस यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. तर कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे.आज तक या हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले की, जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं. १. विधानसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं.१. आयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरला नाही. मला त्यावेळी त्यांचे नाव आठवत नव्हते. तेव्हा मी म्हणालो की, त्या ज्या येथील आयटम आहेत म्हणून.कमलनाथ पुढे म्हणाले की, आयटम या शब्दाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. हा संसदीय वापरातील शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. जर तुम्ही कुठला कार्यक्रम पाहत असाल तर त्यातही आज माझा आयटम नंबर वन ओमकारेश्वर आहे, असा उल्लेख असतो. मग हे काय अपमान करणारे आहे का. मला असं वाटत नाही. मात्र त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सारे काही सुरू आहे. तेच त्यांचे लक्ष्य आहे. आता त्यांनी जनतेसमोर जावं आणि आपल्या पंधरा वर्षांचा आणि ७ महिन्यांच्या हिशोब द्यावा, असे आव्हानही कमलनाथ यांनी दिले.सौदेबाजी करून आणि बोली लावून यांनी सरकार स्थापन केले आहे. हे लोक मध्य प्रदेशच्या जनतेला मूर्ख समजतात. जर मी कोक प्यायचं बंद केलं तर जनतेला रोजगार मिळणार आहे का, यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे चांगला अभिनेते आहेत. त्यांनी मुंबईत जाऊन अभिनय केला पाहिजे आणि मध्य प्रदेशचं नाव पुढे आणलं पाहिजे. त्यांनी अनेक वर्षे असाच अभिनय केलाय. आता जनतेला तो समजू लागला आहे, असेही कमलनाथ म्हणाले.