नवी दिल्ली - कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमारने, आपण काँग्रेसमध्ये का सामील झालो हे सांगितले. तसेच, पक्ष प्रवेशापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आम्ही दोघांनाही भेटवस्तू दिल्या. त्यावेळी, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचा फोटो मी, त्यांना भेट दिल्याचे कन्हैय्याने सांगितले. तसेच, हाच फोटो का भेट दिला हेही कन्हैय्याने स्पष्ट केले.
कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, केवळ लोक नाही, ते एक विचार आहेत. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे.
मोठं जहाज वाचलं पाहिजे
कन्हैया म्हणाला, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते.
...म्हणून आज काँग्रेससोबत उभा आहे - जिग्नेश मेवाणी
गुजरातमधून आमदार असलेले जिग्नेश मेवाणी म्हणाले, जी कहाणी गुजरातमधून सुरू झाली, तिने गेल्या 6-7 वर्षांत जे काही केले, ते आपल्या सर्वांच्या समोर आहे. आपल्या संविधानावर हल्ला आहे. आपल्या आइडिया ऑफ इंडियावर हल्ला आहे. लोकशाहीवर हल्ला आहे. आज भाऊ-भाऊ एकमेकांचे शत्रू होतील, असा द्वेश कारस्थान करून नागपूर आणि दिल्ली पसरवत आहे. काहीही करून या देशाचे संविधान, लोकशाही आणि आयडिया ऑफ इंडियाला वाचवायचे आहे. यासाठी ज्यांनी इंग्रजांना देशातून हकलवून दाखवले, त्याच्या सोबत मला उभे राहायचे आहे. म्हणून मी आज काँग्रेससोबत उभा आहे.