मुंबई - एका गाण्यामुळे एका रात्रीत लोकप्रिय झालेल्या रानू मंडलचं आयुष्यच बदलून गेलंय. रानू यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं एका रात्रीत इतकं जीवन बदलेल. रानू मंडल स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती नामक व्यक्तीनं व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तिला हिमेश रेशमियाने आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. तर, तब्बल 10 वर्षांपासून दूर असलेली तीची मुलगीही परतली.
रानू पश्चिम बंगालमधील रानाघाट स्टेशनवर गाणं गाऊन जीवन व्यतित करत होती. तिला बऱ्याच लोकांनी गाणं गाताना पाहिलं होतं. मात्र लोक नेहमी तिच्याकडे कानाडोळा करत होते. मात्र, एका व्हिडिओमुळे रानूला हिमेशने त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे. हिमेशच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे हॅप्पी हार्डी अँड हीर. यात रानूने तेरी मेरी कहानी असं बोल असणारं गाणं गायलं आहे. हिमेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात रानू स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करते आहे. तिच्यासोबत हिमेश रेशमिया स्वतः उभा असून तिला मार्गदर्शन करताना दिसतो आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यांतर रानू मंडल यांना त्यांच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांनीही भेटण्यासाठी धाव घेतली. गेल्या 10 वर्षांपासून दूर असलेल्या त्यांच्या मुलीनेही आईला गळाभेट दिली.
आईच्या भेटीबाबत बोलताना साती रॉयने स्पष्टीकरण दिले आहे. मी स्वत: घटस्फोटीत असून माझंही आयुष्य दु:ख आणि वेदनांनी भरलेलं आहे. माझी आई रानू डिप्रेशनचा शिकार बनली होती. त्यानंतर, आईने घर सोडून दिले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर आई माझ्यासोबत 7 ते 8 वर्षांपासून राहत होती. मात्र, डिप्रेशनचा शिकार झाल्यामुळे ती कुटुंबीयांसमेवत राहत नसे. त्यामुळे आईने स्वत:च घर सोडले होते. त्यानंतर, आईचा आणि माझा संपर्कच झाला नाही. अनेकदा नातेवाईक आईबद्दल माहिती द्यायचे. या ठिकाणी, त्या ठिकाणी आईला पाहिल्याचं ते सांगत. मात्र, माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे मी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं साती यांनी म्हटलं आहे. आईच्या आवाजाला मिळालेला प्रतिसाद हे तिच्या दुसऱ्या आयुष्याचा जन्म असल्याचंही मुलगी साती रॉय यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदुस्तान डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, रानू मंडलला पहिल्यावहिल्या गाण्यासाठी हिमेशने जवळपास ६ ते ७ लाख रुपये मानधन दिले आहे. मात्र हिमेशने देऊ केलेले मानधन रानू स्वीकारात नव्हती. हिमेशने त्यांना अगदी आग्रहाने हे पैसे दिले. तसेच, बॉलिवूडमध्ये तुम्हाला अच्छे दिन येणार असल्याचंही हिमेशने त्यांना म्हटलंय.