नवी दिल्ली - शिवसेनेचे मोदी सरकारमधील एकमेव मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे विश्वासार्हतेला तडा गेला आहे. आता राज्यात नव्या आघाडीसह शिवसेनेचे सरकार बनत आहे. अशा परिस्थितीत केंद्रात मंत्री म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असे अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले. तसेच मी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे युतीचे काय झाले आहे, ते तुम्ही समजून घ्या असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज मी केंद्रातील माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मी या देशाचा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. मोदींनी माझ्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रमची जबाबदारी दिली. मी सहा महिने ही जबाबदारी पार पाडली. मात्र गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील युतीच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. महायुतीला जनादेश मिळाला होता. भाजपाध्यक्ष आणि भाजपाने सत्तेच्या समसमान वाटपाचा दिलेला शब्द पाळला नाही. आपण असा शब्द दिल्याचेही त्यांनी नाकारले. आता राज्यात नव्या समीकरणासह सरकार स्थापन होत आहे. अशा परिस्थितीत केंद्रात मंत्री म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.
अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.