मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सूरतमधील एका कोर्टाने दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतरही राहुल गांधी यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान, सध्या परदेशात असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनीही त्यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राहुल गांधी यांना इशारा दिला आहे.
ललित मोदी म्हणाले की, राहुल गांधी हे आता केवळ एक सामान्य नागरिक आहेत. ते वारंवार मी फरार असल्याचा आरोप करतात. मात्र मी सुद्धा एक सामान्य नागरिक आहे. मला असं वाटतं की विरोधी पक्षांकडे करण्यासारखं काही उरलेलं नाही. त्यांच्याकडे एकतर चुकीची माहिती आहे किंवा ते सूडबुद्धीने बोलत आहेत.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये ललित मोदी म्हणाले की, मी राहुल गांधींविरोधात त्वरित यूकेमधील कोर्टात जाणार आहे. मला विश्वास आहे की, त्यांना काही सबळ पुरावे घेऊन यावं लागेल. मी त्यांना पूर्णपणे मूर्ख बनताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.
ललित मोदी पुढे म्हणाले की, मी गेल्या १५ वर्षांपासून आयपीएलमधून एक पैसाही घेतला. मात्र मी आयपीएललच्या माध्यमातून बोर्डाला १०० कोटींहून अधिकची कमाई करवून दिली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडे परदेशात संपत्ती आहे. एवढंच नाही तर मी फोटो आणि पुरावेही पाठवू शकतो. राहुल गांधींना वाटतं की ते या देशावर राज्य करण्यासाठीच जन्मले आहे आणि तेच खरे हक्कदार आहेत. मी भारतात परत येऊ शकतो. मात्र त्यासाठी नव्या कायद्याची आवश्यकता असेल.