होणारा जावई आणि सासू यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होऊन दोघेही पळून गेल्याच्या घटनेची चर्चा सध्या देशपातळीवर होत आहे. उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील मोहनपुरा गावातील सासू आणि होणाऱ्या जावयाच्या या लव्ह स्टोरीबाबत दररोज काही ना काही माहिती समोर येत असते. दरम्यान, होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेली महिला सपना देवी हिला आपण घटस्फोट देणार नसल्याचे या पती जितेंद्र याने सांगितलं आहे.
जितेंद्र म्हणाला की, मी माझी पत्नी सपना देवी हिला घटस्फोट देणार नाही. कारण माझ्या घरी लहान लहान मुलं आहेत. तसेच या सर्व प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला धक्का बसला आहे. माझ्या मनातील वेदना मलाच ठावूक आहेत. मी माझ्या मुलांना कसंबसं सांभाळत आहे.
होणाऱ्या जावयासोबत पळून जाताना सपना हिने घरामधून साडे तीन लाख रुपये, सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने आणि एक लाख रुपयांची नाणी नेली, असल्याचा आरोपही जितेंद्र याने केला. या दोघांकडे माझे मोबाईल असून, या सर्व वस्तू मला परत मिळाल्या पाहिजेत, अशी मागणीही त्याने केली आहे.
तसेच होणाऱ्या जावयाने माझी पत्नी सपना हिची दिशाभूल केली आहे. या मुलाने आधीही दोन प्रकरणात असं केलेलं आहे. तो महिलांना फसवून त्यांच्याकडील दागदागिने आणि पैसे घेऊन फरार होतो. तसेच नंतर त्यांना सोडून देतो. यातील काही महिलांवर तर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येते, असा दावाही जितेंद्र याने केला.
दरम्यान, होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सपना देवी हिच्या भावाने बहिणीने केलेल्या कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, ती खूपच वाईट वागली आहे. ती बहीण म्हणण्याच्या पात्रतेची नाही. जर ती घरी आली नाही तर तिला आणि तिच्यासोबत पळून गेलेल्या तरुणाला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.