नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रिंगणात उतरलेल्या 672 उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद झाले आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी नेमकं किती टक्के मतदान झालं, हे लवकर समजलंच नाही. कारण, निवडणूक आयोगाने आकडेवारीच जाहीर केली नव्हती. निवडणूक आयोगाच्या शेवटच्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाले होते. मात्र, निवडणूक आयोगाने रविवारी उशिरा दिल्लीतील विधानसभा निवडणुकातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. तर, केजरीवाल यांच्याकडून केलेल्या कामाला जनतेसमोर ठेवत प्रचार सुरू होता. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरली. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत.
विधानसभेच्या मतदानानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर न केल्यामुळे निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता. अखेर, निवडणूक आयोगाने कामाचा ताण, आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यस्ततेमुळे टक्केवारी जाहीर करण्यास उशिर झाल्याचे सांगितले. तसेच, दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये 62.59 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या विधानसभेला दिल्लीत 67.1 टक्के मतदान झाले होते. बल्लीमरान येथे सर्वाधिक 71.6 टक्के मतदान झाले असून दिल्ली कँट येथे सर्वात कमी म्हणजेच 45.4 टक्के मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. मतदानच्या अंतिम टक्केवारीची एक प्रक्रिया असते. मतदान प्रकियेनंतर जेव्हा डेटा येतो, तेव्हा तो सर्वत्र जोडला जातो. त्यानंतरच, डेटा शेअर करण्यात येतो. त्यासाठी वेळ लागतो, म्हणून उशि झाल्याचं आयोगाने स्पष्टीकरण दिलंय.