बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत. बागेश्वर महाराज यांच्या दाव्यावर मोठी चर्चा सध्या सुरु आहे. त्यातच अंधश्रद्दा निर्मूलन समितीने त्यांना आव्हान दिल होते. आता, एका जादुगारानेही बागेश्वर बाबांना आव्हान दिलं आहे.
बागेश्वर बाबा मनातलं ओळख असल्यामुळे बालाजी प्रसन्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, मनातलं ओळखणं ही एक कला असून 'माईंड रीडर' सुहानी शाह देखील चर्चेत आली आहे. त्यानंतर, आता देशातील प्रसिद्ध जादूगार शिव कुमार यांनी धीरेंद्र शर्मा यांना आव्हान दिलं आहे. जगात कुठेही दिव्यशक्ती नसून जादू हीच एक विद्या असल्याचं त्यांनी म्हटलं. जादू ही अलौकीक किंवा चमत्कार नसून ते विज्ञान कलेचं रुप आहे. आम्ही ज्या पद्धतीने ते दाखवून देतो, त्यातून ही जादू असल्याचा भास समोरच्या व्यक्तींना होतो, असेही शिवकुमार यांनी म्हटले आहे.
मेडिटेशन, योगा आणि बहुरंगी कलांचा समावेश जादूच्या कलेत आहे. मिक्स आर्ट किंवा जादू असंही या कलेला म्हटलं जातं. अलवर येथे जादूचा शो करत असताना शिव कुमार यांनी बागेश्वर धामच्या महाराजांना आव्हानच दिलं आहे. जादूगरांसमोर तुमची दिव्य शक्ती किंवा अलौकिक शक्ती दाखवा, सिद्ध करा. तसे केल्यास सर्वच जादूगार तुमच्या आश्रमात सेवा देतील, असे चॅलेंज जादूगार शिव कुमार यांनी बागेश्वर बाबांना केलं आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वच जादूगरांना २८ जानेवारी रोजी त्यांनी अलवर येथे बोलावले आहे.
दरम्यान, सनातन धर्मात देव आहे, आणि देव असायला पाहिजे. मात्र, देवाच्या नावाने चमत्कार ही अंधश्रद्धा आहे, असेही जादूगार शिव कुमार यांनी म्हटले.
माईंड रिडर सुहानीने करुन दाखवलं
सुहानी शाह प्रसिद्ध माइंड रीडर आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखण्याचे काम त्या करत आहेत. यासंदर्भात तिने अनेक लाईव्ह शो केले आहेत. फक्त पहिलीपर्यंत शिक्षण सुहानीचे झाले आहे. ६० विद्यार्थ्यांसोबत राहण्यापेक्षा ६० हजार लोकांसमोर कार्यक्रम घेण्याचा तिच्या वडिलांनी सल्ला दिला. त्यानंतर शाळा सोडली अन् लाईव्ह शो करुन लोकांचे मन ओळखू लागल्या.