... तर त्याचा एकदा विचार आम्ही करू, नाना पटोलेंचा संजय राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:51 PM2021-07-20T15:51:25+5:302021-07-20T15:52:08+5:30
सामनाच्या अग्रलेखासंदर्भात नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला होता. संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती, त्यावरुन नानांना दिल्लीत पत्रकारांना प्रश्न विचारला. त्यावर, उत्तर देताना, मी सामना वाचत नाही, मी प्रतिक्रिया देणार नाही, असे नानांनी म्हटले.
मुंबई - सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही, असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल! असे म्हणत शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. त्यावरुन, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीसंजय राऊतांना टोला लगावला आहे.
सामनाच्या अग्रलेखासंदर्भात नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला होता. संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती, त्यावरुन नानांना दिल्लीत पत्रकारांना प्रश्न विचारला. त्यावर, उत्तर देताना, मी सामना वाचत नाही, मी प्रतिक्रिया देणार नाही, असे नानांनी म्हटले. मात्र, त्याचबरोबर संजय राऊत यांना टोलाही लगावला. कोणी काय टीका करावी हा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, त्यावर प्रतिक्रिया द्यायची का हा आमचा अधिकार आहे. पण, वारंवार एखाद्या पक्षाकडून सोबत राहूनही बोललं जात असेल, तर त्याचा एकदा विचार आम्ही करू, असे पटोले यांनी म्हटलं.
काँग्रेसला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. सुईपासून रॉकेटपर्यंत या देशाची उभारणी काँग्रेसने केली आहे. गांधी परिवारावर टीका करणाऱ्याने एक लक्षात ठेवावं. सूर्यावर थुंकल्यानंतर ते आपल्याच अंगावर पडतं, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे. नाना पटोले सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आज ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दिल्ली दौऱ्यावर असताना नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकार आणि गुजराती उद्योजकांवरही निशाणा साधला.
संजय राऊतांची काँग्रेसवर टीका
स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे योगदान मोठेच आहे. काँग्रेस पक्ष हिंमतवाला होता, डरपोक नव्हता. देशभक्तीशी त्यांचे अतूट नाते तेव्हा होतेच, पण तो काँगेस पक्ष आज उरलेला नाही. असे म्हणत, काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे व त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देशातील काँग्रेस पक्षाची डळमळीत स्थिती आणि त्यातील उलाढाली यांवर राऊतांनी रोखठोक भाष्य केले आहे.
काँग्रेस पक्षाच्या कमजोरीचा फायदा राज्यांतील नेते घेत आहेत -
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राऊत म्हणाले, "काँग्रेस पक्षात सध्या काही उलढाली सुरू आहेत. कार्यकर्त्यांसाठी त्यातून सकारात्मक संदेश जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ यांच्या फेऱ्या सोनियांच्या निवासस्थानी वाढल्या आहेत. कमलनाथ हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होतील, अशी वावटळ त्यामुळे उठली आहे. खरे काय ते राहुल गांधींनाच माहीत. पंजाबात नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रदेश अध्यक्षपदी नेमणूक करून पक्ष संघटनेत आता इतर कोणाची दादागिरी चालणार नाही हे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर व नवज्योत यांच्यात बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू होता. सिद्धू हे काँग्रेस सोडतील अशी हवा होती, पण गांधींनी वेळीच हस्तक्षेप केला. काँग्रेस पक्षाच्या कमजोरीचा फायदा राज्यांतील नेते घेत आहेत. राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात काँग्रेस किंवा गांधी कुटुंबाच्याच नावावर हे नेते निवडणुका जिंकतात, सत्तेवर येतात व सत्तेवर येताच हे सर्व ‘माझ्यामुळेच झाले’ अशी डिंग मारतात. या डिंगबाजीस पंजाबात तडा गेला आहे. सोनिया गांधींचा जो आदेश असेल तो मानू, असे कॅ. अमरिंदर यांना जाहीर करावे लागले. राजस्थानात अस्वस्थता आहे. मध्य प्रदेशातील सरकार हातचे गेले आहे.