बंगळुरू - शुभ-अशुभ, ग्रह-तारे, ज्योतिष यावर राजकारण्यांचा असलेला विश्वास काही नवा नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचा तर ज्योतिषावर जरा जास्तच विश्वास आहे. कुमारस्वामी आणि त्यांचे भाऊ एच.डी. रेवण्णा यांच्या मुहुर्तावर असलेल्या विश्वासाच्या कहाण्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान, मंगळवारीही असाच प्रकार समोर आला. त्याचे झाले असे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेल्या एच. डी. कुमारस्वामी यांना मंगळवारी दुपारपर्यंत घराबाहेर पडण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिला. त्यामुळे कुमारस्वामी यांनी सर्व कार्यक्रम टाळत संध्याकाळपर्यंत घरातून बाहेर न पडणे पसंद केले. मंगळवारी दुपारपर्यंत सर्वपित्री अमावस्या होती. त्यामुळे अशुभ योग असल्याने ज्योतिषाचार्यांनी कुमारस्वामी यांनी घराबाहेर न पडणयाचा सल्ला दिला होता. दरम्यान, जेडीएसमधील एका नेत्याने सांगितले की, "अमावस्येदिवशी कुमारस्वामी यांचे कुटुंबीय विशेष पूजा करतात, ही बाब सर्वश्रुत आहे. सर्वपित्री अमावस्या सोमवारी सुरू झाली होती. तसेच मंगळवार दुपारपर्यंत अमावस्येचा योग होता. त्यामुळे त्यांच्या घरातील पूजा मंगळवारी सकाळपर्यंत चालली असावी, त्यामुळेच त्यांना सकाळच्या वेळेतील कार्यक्रम स्थगित करावे लागले, असावेत," मात्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. रामनगर येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करत असल्याने कुमारस्वामी यांनी मंगळवारी सकाळी आपले सर्व कार्यक्रम स्थगित केले होते. ज्योतिषाच्या सांगण्यावरून ते घरी राहिल्याचे वृत्त खोटे आहे, असे कुमारस्वामी यांना माध्यम समन्वयक एच.बी. दिनेश यांनी सांगितले. मंगळवारच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये सकाळी दीन दयालू नायडू यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सहभागी होणे. तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाण्यासारखे कार्यक्रम नियोजित होते. मात्र कुमारस्वामी या कार्यक्रमांना उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, कुमारस्वांमींच्या शपथविधीचा कार्यक्रमसुद्धा त्यांचे भाऊ रेवण्णा यांनी ज्योतिषांच्या सांगण्यानुसार नियोजित केल्याचे सांगण्यात येते.
म्हणून कुमारस्वामी यांनी स्वत:ला घेतले घरात कोंडून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 1:00 PM