...म्हणून नरसिंह राव यांना भाजपाचे पंतप्रधान म्हटलं, मणिशंकर अय्यर यांनी सांगितलं ते कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 06:25 PM2023-08-24T18:25:55+5:302023-08-24T18:26:46+5:30
P. V. Narasimha Rao: माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, या आपल्या विधानाचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुनरुच्चार केला आहे.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, या आपल्या विधानाचा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुनरुच्चार केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, हो नरसिंह हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते, असं मी म्हटलं होतं. आम्ही निर्णय घेतला होता की, निवडणूक हरल्यानंतर विरोधी पक्षांचं एक अधिवेशन होईल आणि त्यासाठी थीम तयार करायची होती. तेव्हा नरसिंह राव मला म्हणाले की, या प्रश्नांची उत्तरं द्या. हज मंजिल मुंबईमध्ये का आहे? हिंदूंसाठी काही का नाही? असा त्यांच्या प्रश्नांचा रोख होता.
मणिशंकर अय्यर यांनी पुढे सांगितले की, जेव्हा आम्ही आम्ही उत्तरं लिहून आणली तेव्हा नरसिंह राव म्हणाले की, मला ती पाहायची नाही आहेत. ते म्हणाले की, हा काँग्रेसचा विचार आहे. त्यानंतर काय होणार होतं. ते संमेलन कुठल्याही थीमविनाच झालं. राजीव गांधी यांच्या सदभावना यात्रेवेळी तब्येत बरी नसल्याचे सांगत नरसिंह राव यांनी भाग घेतला नाही. मला राम-रहीम यात्रेच्यामधूनचन बोलावून घेतलं. मी दिल्लीला आलो तेव्हा नरसिंह राव म्हणाले की, माझा यात्रेला काहीच आक्षेप नाही आहे, पण तुमच्या सेक्युलॅरिझमची थोडी अडचण आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी म्हटलं ही तर भाजपाची विचारसरणी आहे.
अय्यर पुढे म्हणाले की, या घटनेनंतर माझ्या मनात एक शंका उपस्थित झाली. जेव्हा बाबरी पाडण्यात आली तेव्हा नरसिंह राव पूजा करत होते. एका बैठकीत राव म्हणाले होते की, जुन्या काळात राजा साधू-संतांकडून सल्ला घ्यायचे. मात्र यावेळी साधू-संतांनी माझ्याकडून सल्ला ऐकला नाही. मी मनात विचार करत होतो की, हे कशा प्रकारचे पंतप्रधान आहेत.
अय्यर यांनी यावेळी राजीव गांधींवरही टीका केली. ते म्हणाले की, अयोध्येमध्ये भूमीपूजन करणं ही राजीव गांधी यांची मोठी चूक होती. तसेच मी अन्य कुणाला दोषी ठरवत नाही आहे. अयोध्येत भूमिपूजन करणं हे पाप होतं. मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी स्वत: निर्णय घेतले पाहिजेत. मात्र शेवटी तो पंतप्रधानांचा निर्णय असतो. त्या भूमिपूजनामुळे काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपाला एवढं बळ मिळालं की, त्यानंतर आम्ही भाजपाला रोखू शकलो नाही.