ऑनलाइन लोकमत
सिक्कीम, दि. 7 - भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा सिक्कीममध्ये जिथे मिळते त्या ट्राय जंक्शनवरुन भारताने माघार घ्यावी यासाठी चीनकडून विविध मार्गांनी दबाव आणला जात आहे. पण भारताने आता रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिथे खोदकाम सुरु केले आहे. एका हायडेल प्रोजेक्टपासून 30 किमी अंतरावर हे खोदकाम सुरु आहे. झलोंग येथील जलढाका नदीवर हा हायड्रो इलेक्ट्रीक प्रोजेक्ट आहे. झलोंग भूतानच्या सीमेपासून फार लांब नाहीय.
या भागातून वाहणा-या जलढाका आणि तोर्षा नदी ब्रम्हपुत्रा नदीला जाऊन मिळते. चीनची डोकलाममध्ये रस्ता बांधायची जी योजना आहे ती यशस्वी झाली तर, हा भाग थेट चीनच्या टप्प्यात येईल. रस्ते बांधणीच्या निमित्ताने चीनचा जो इरादा आहे त्यामध्ये चीनला वर्चस्व मिळाले तर सिलीगुडी कॉरिडोर आणि सिलीगुडी शहराची सुरक्षा धोक्यात येईल तसेच चीनी सैन्याला सहज भारतीय हद्दीत घुसखोरी करता येईल.
आणखी वाचा
रस्ते बांधणीमुळे रणनितीक दृष्टीकोनातून चीनला फायदा पोहोचणार असल्याने यावर ठोस तोडगा निघत नाही तो पर्यंत भारत मागे हटण्याचा विचार करणार नाही. ट्राय जंक्शनजवळ भारताने रस्ते बांधणीचे काम रोखून धरल्याने चीन सध्या प्रचंड चिडला आहे. भूताननेही चीनने त्यांच्या प्रदेशात घुसखोरी केल्याने निषेध नोंदवला आहे.
चीनची चालूगिरी
चीनने गुरुवारी जी 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक रद्द करत असल्याचे जाहीर केले. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्या वातावरण योग्य नसल्याचं सांगत चीनने भेटीसाठी नकार दिला. पण प्रत्यक्षात दोन्ही नेत्यांमध्ये अशा कुठल्या भेटीचा कार्यक्रमच ठरला नव्हता असा खुलासा भारताने केला.
भूतान फार आनंदी देश नाही
भूतान हा फार आनंदी देश नसल्याचा कांगावा चिनी मीडियानं सुरू केला आहे. हॅप्पीनेस इंडेक्समध्ये भूतान सर्वोच्च स्थानावर असला तरी त्या देशातील लोक आनंदी नाहीत, असं चिनी मीडियानं म्हटलं आहे. चिनी मीडियानं आता भारताला लक्ष्य करत भूतानवर निशाणा साधला आहे. भारत-चीनच्या वादात भूतानही सामील झाल्यामुळे चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भूतान हा भारताच्या दबावाखाली आहे, त्यामुळे दिल्लीतल्या हुकूमशाहांचा आदेश मानण्याशिवाय भूतानकडे दुसरा पर्याय नाही.
मोठा युद्धसराव, भारत, अमेरिका व जपान यांच्या संयुक्त कवायती
चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींमुळे भारत, अमेरिका व जपान यांच्या संयुक्त कवायती मलबार कवायती या नावाने सुरू होत आहेत. चीनच्या विरोधात एकत्रितपणे ताकद दाखवण्याचा हा मार्ग आहे. या त्रिपक्षीय युद्धाभ्यासामध्ये १५ मोठ्या युद्धनौका, दोन पाणबुड्या, अनेक विमाने तसेच टेहळणी करणारी हेलिकॉप्टर्स सहभागी होणार आहेत.
पुढील आठवड्यात हा युद्धाभ्यास सुरू होत आहे. दक्षिण चिनी समुद्रात चीनची मुजोरी वाढत असून, त्याचा त्रास जपानलाही होत आहे. त्या भागावरही चीन ताबा सांगत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही अडथळे येत असल्याने चीनने ते थांबवावेत, असा अमेरिकेचा आग्रह आहे. अमेरिकेच्या गस्ती नौकांनाही चीनचा त्रास होत आहे.