जयपूर - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लॉकडाऊनच्या या कालावधीत अनेक घटना उघडकीस येत आहेत. लोकांकडून जाणीवपूर्वक कोरोनाची लक्षणं लपविण्यात येत आहे, विनापरवाना प्रवास करण्यात येत आहे. पोलिसांकडून याकडे लक्ष देण्यात येत असलं तरी काहीजण कायदा मोडून अशी कामं करत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्येही अशीच एक घटना उघडकीस आली. त्यानंतर, पोलिसांनी जळत्या प्रेतावर पाणी टाकून अंत्यसंस्काराचा विधी थांबवला आहे.
जयपूर येथील संशयास्पद मृत्यु झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यावेळी, अचानक पोलिसांनी स्मशानभूमी गाठून जळत असलेल्या चीतेवर पाणी टाकले. संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात त्या मृत व्यक्तीचा कोरोना स्वॅब घेण्यात आला. त्यानंतर, मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीच्या मृत्युनंतर नातेवाईकांनी गुपचूपपणे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत, एका व्यक्तीने पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी ज्योतीनगर परिसरातील स्मशानभूमीत जाऊन जळत्या प्रेतावर पाणी टाकून अंत्यसंस्कारचा विधी थांबवला.
दरम्यान, नातेवाईकांनी अचानपणे अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेजारील व्यक्तींना संशयास्पद कृती वाटली. त्यातूनच पोलिसांनी याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनीही मृतदेह ताब्यात घेत मृत व्यक्तीचे स्वॅब घेतले. अद्याप याचा अहवाल आला नाही.