ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अधिका-यांच्या निष्काळजी वृत्तीमुळे निराश झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिका-यांनी केलेल्या प्रेझेंटेशनवर असमाधान दर्शवत पंतप्रधान मोदींनी त्यांना पुन्हा काम करायला लावत चांगले प्रयत्न करण्यास सांगितले. इतकंच नाही तर अधिका-यांच्या निष्काळजी वृत्तीवर नाराज झालेले मोदी सुरू असलेले प्रेझेंटेशनही अर्ध्यावरच सोडून निघून गेले.
गेल्या आठवड्यातही मोदींनी असेच एक प्रेझेंटेशन अर्ध्यात सोडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा पद्धतीने प्रेझेंटेशन अर्ध्यावरच सोडून जाणं असामान्य बाब आहे. कारण साधारणतः पंतप्रधान प्रेझेंटेशनदरम्यान पूर्णवेळ थांबून सर्वांचे म्हणणे बारकाईने ऐकतात, तसंच त्यानंतर होणा-या चर्चेत सहभागही घेऊन आपली मतही मांडतात.
त्यामुळे प्रेझेंटेशन मध्यावर सोडून निघताना, अशा पद्धतीचा निष्काळजीपणा यापुढे सहन केला जाणार नाही, असा संकेतच पंतप्रधान मोदींनी अधिकारी वर्गाला दिल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी आपल्या अधिका-यांना असेही निर्देश दिले आहेत की, त्यांनी आपल्या कार्यातील गुणवत्तेवर अधिक लक्ष द्यावे.
दरम्यान, सदर प्रेझेंटेशन हे कृषी आणि संबंधित क्षेत्रातील अधिकारी सादर करत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी अधिका-यांसमोरच प्रेझेंटेशनबाबत खूश नसल्याचे जाहीर केले. पंतप्रधानांनी अधिका-यांना क्षेत्रातील नवीन कल्पना आणि धोरणांसदर्भात सूचना आणण्यास सांगितले होते, मात्र अधिका-यांची अपूर्ण तयारी दिसल्याने पंतप्रधान मोदींनी बैठक अर्ध्यातच सोडली.
'मला असे वाटत की तुम्ही पूर्ण प्रयत्न केले नाहीत. जा आणि मेहनत करून पुन्हा प्रेझेंटेशन सादर करा', असा शब्दांत मोदींनी अधिका-यांचे कान टोचले. तसेच याआधी आरोग्य, स्वच्छता व नागरी विकास मंत्रालयातील अधिकारी करत असलेले प्रेझेंटेशनच्या सुरुवातीलाच मोदी उठून गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.