...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचं उदघाटन करू नये, राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, असं आवाहनही केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 01:36 PM2023-05-21T13:36:24+5:302023-05-21T13:37:16+5:30
New Parliament House: नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी होणार आहे. मात्र या उदघाटनावरून आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नव्या संसद भवनाच्या उदघाटनाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. मात्र या उदघाटनावरून आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या उदघाटनावरून वेगळी भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचं उदघाटन करू नये, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसद भवनाचं उदघाटन करण्यात यावं, असं मत राहुल गांधी यांनी मांडलं आहे.
नव्या संसद भवनाच्या उदघाटनाच्या तारखेवरून आधीच वाद झाला होता. त्यावेळी संसद भवनाच्या उदघाटनासाठी २८ मे हीच तारीख का निश्चित करण्यात आली, यावरून सवाल उपस्थित करण्यात आला होता. या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मतारीख असल्याने ही तारीख निवडण्यात आल्याचा दावा विरोधकांनी केला होता. तसेच २८ तारीख जाणीवपूर्वक निवडण्यात आली कि, तो केवळ एक योगायोग आहे, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला होता.
याआधीही काँग्रेसने या मुद्द्यावरून आरोप केले होते. संसद भवनाचं उदघाटन राष्ट्रपतींकडून न करून घेणे हा राष्ट्रपतींचा अपमान आहे, असे काँग्रेसने म्हटले होते. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी संसदेची नवी इमारत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक अहंकाराची योजना आहे, असा दावा केला होता. त्यांनी नव्या संसद भवनाची पाहणी करतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो शेअर करत मोदींवर टीका केली होती. नव्या संसद भवनाचे एकमेव वास्तुकार, डिझायनर, निर्माते, ज्याचं उदघाटन ते २८ मे रोजी करणार आहेत. छायाचित्र सारं काही कथन करतं, असा टोलाही त्यांनी लगावला होता.