नवी दिल्ली - भारताचा दोन दिवसांचा धावता दौरा आटोपून रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन शुक्रवारी संध्याकाळी रशियाला रवाना झाले. अनेक महत्त्वपूर्ण करार मार्गी लागल्याने भारत आणि रशियाच्या दृष्टीने पुतिन यांचा हा दौरा यशस्वी ठरला. मात्र या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताचे खास मित्र असलेल्या रशियन राष्ट्रपतींचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले नाही. पण या मागचे कारणही तसेच आहे. धावत्या दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पुतिन यांनी औपचारिक स्वागत समारंभांना फाटा देण्यास सांगितले होते. त्यामुळेच भारताने राजशिष्टाचाराला मुरड घालून पुतिन यांच्यासाठी स्वागत समारंभ आयोजित केला नाही.पुतिन यांच्या भारत दौऱ्यातील कार्यक्रमांमध्ये शक्य असेल तेवढी अनौपचारिकता ठेवण्याची विनंती रशियाकडून करण्यात आली होती. स्वागत समारंभासारखे औपचारिक कार्यक्रम टाळण्यात आल्याने पुतिन यांना मोदींसोबत चर्चा करण्यासाठी अधिकाधिक वेळ मिळाला. मात्र अशा परिस्थितीतही गुरुवारी रात्री रशियन राष्ट्रपतींसाठी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या 7 लोककल्याण मार्ग प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्यात सुमारे तीन तास वन टू वन चर्चा झाली. या दौऱ्याला देण्यात आलेला अनौपचारिकपणा हा दोन्ही नेत्यांमधील चांगल्या संबंधांचा दर्शक आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. दोन दिवसांच्या भारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हैदराबाद हाऊस येथे भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमधून संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासंबंधीचे महत्त्वपूर्ण करार मार्गी लागलेय. तसेच द्विपक्षीय व्यापार दृढ करण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
म्हणून पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात करण्यात आले नाही औपचारिक स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 9:10 AM