नवी दिल्ली - नागरिकता संशोधन विधेयक आणि एनआरसी याला विरोध करत गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील शाहीन बाग येथे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी गोळीबारही झाला आहे. हाच धागा पकडत हे आंदोलन भाजपला हव असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अन्यथा आपण दोन तासांतच शाहीन बाग येथील रस्ता खुला केला असता, असंही केजरीवाल म्हणाले.
अमित शाह यांच्यासारखे पावरफूल व्यक्ती शाहीन बागचा रस्ता काधीही खुला करू शकतात. मात्र ते खुला करू इच्छित नाही. त्यांना निवडणुकीत याचा फायदा होणार आहे. आमच्याकडे अधिकार असते तर दोन तासांत शाहीन बाग खुले केले असते. भाजपला संपूर्ण निवडणूक शाहीन बाग मुद्दावर लढवायची आहे. निवडणुकीनंतर हा मुद्दा समाप्त होईल, असा दावा केजरीवाल यांनी केला.
दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था आमच्या हातात नाही. त्यामुळे मी शाहीन बाग येथील रस्ता खुला करू शकत नाही. तसेच हे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आहे. हा मुद्दा केंद्रसरकारच्या अखत्यारित आहे. तिथे जावून मी काय करणार, असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला. तसेच शाहीन बाग येथे तीनवेळा गोळीबार झाला आहे. भाजपने निवडणुकीतील फायद्यासाठी राजधानीतील कायदा सुव्यवस्था पणाला लावल्याचा दावा, केजरीवाल यांनी केला.
दरम्यान आम आदमी पक्ष सर्वात मोठा देशभक्त पक्ष आहे. आम्ही अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आलो आहोत. जनतेसाठी आम्ही अनेकदा उपोषणे केल्याची आठवण केजरीवाल यांनी करून दिली.