नवी दिल्ली - राज्याचे २९ वे मुख्यंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, नेते दिवाकर रावते, डॉ. निलम गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंनी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की... असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे, अजित पवारांचे बंड थंड झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र, अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा का दिला होता, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.
भाजपासोबत एकत्र लढूनही शिवसेना निवडणुकीनंतर भाजपासून वेगळी झाली. तर भाजपा-शिवसेनेविरुद्ध निवडणुका लढविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. पण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काका शरद पवारांना दे धक्का करत भाजपाला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं. अगदी, सकाळी-सकाळी शपथविधीही घेण्यात आला. त्यामुळे मी पुन्हा येईन, असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मात्र, अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर बहुमत सिद्ध करणे शक्य नसल्यान देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांच्या संमतीशिवाय पाठिंबा का दिला, अशी चर्चा सुरू आहे. पण, शरद पवार यांच्या दोन अटी भाजपाने मान्य केल्या असत्या, तर भाजपाने महाराष्ट्रातील सत्ता गमावली नसती, असे वृत्त नवभारत टाईम्स या हिंदी वेबसाईटने दिलंय.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 2 अटी मानल्या असत्या, तर भाजपाची सत्ता कायम राहिली असती. भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला असता, अशी माहिती आहे. त्यानुसार, मोदी सरकारमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना कृषीमंत्रीपदे देण्यात यावे, आणि दुसरी महत्त्वाची अट राष्ट्रवादीने घातली होती. राष्ट्रवादीची दुसरी अट म्हणजे, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती नको, त्यांच्याऐवजी दुसरं कुणालाही ते पद देण्यात यावे. भाजपामधील काही सुत्रांनी IANS या वृत्तसंस्थेला माहिती दिलीय. त्यानुसार, जर महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीला कृषीमंत्रपद दिलं, तर बिहारमध्ये जुना मित्रपक्ष रेल्वे मंत्रीपदाचा दावा करेल. त्यामुळे स्पष्ट बहुमत असतानाही. दोन मोठी खाती भाजपाकडून जातील, असे भाजपाला वाटत होते.
फडणवीसांना हटविण्याची भाजपाची नव्हती तयारीमहाराष्ट्रात 5 वर्षे भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार चालविण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलंय. तर, विधानसभा निवडणुकीतही भाजपाने देवेंद्र यांचाच चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केला होता. या निवडणुकीत भाजपला यशही मिळालं. त्यामुळे फडणवीस यांच्याशिवाय दुसऱ्या नावाला सहमती दर्शवणं हे भाजपाला शक्य नव्हतं, अशीही माहिती आहे.
शरद पवारांनी मोदी-शहाला पाठवला होता संदेशशरद पवार यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना या दोन अटींसोबतचा निरोप पाठवला होता. त्यामुळेच, निकालानंतर भाजपाविरुद्ध शरद पवारांनी मोठी टीका केली नाही. याउलट शिवसेना-भाजपामधील 'सामना' त्यांनी मजेशीरपणे पाहिला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात आले होते.