नवी दिल्ली - जेएनयूची विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघाच्या माजी नेत्या शेहला रशीद यांच्या विधानावरुन केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी आक्रमक प्रतिक्रिया घेतली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, सुरक्षा जवान आपल्या देशाची सुरक्षा करतात. त्यांच्याविरोधात चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. सोशल मीडियावर जम्मू काश्मीरबाबत खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. भारताची बरबादी पाहणाऱ्यांना या देशात जागा नाही. अशा लोकांना अथवा पक्षाला तुडवलं पाहिजे अशी भूमिका किशन रेड्डी यांनी घेतली आहे.
किशन रेड्डी यांनी सांगितले की, ज्या लोकांना भारताची बरबादी हवी आहे. त्यांचे समर्थन करतात. अफजल गुरुबाबत बोलतात अशा लोकांना किंवा पक्षाला तुडवलं पाहिजे. अशा शक्तींसाठी भारतात कुठेही जागा नाही. भारताचे सैन्य आणि देशाचं रक्षण करणारे जवान यांच्याबाबत चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. मग ते पाकिस्तान असो अथवा कोणताही राजकीय पक्ष असं त्यांनी सांगितले.
भारताच्या विरोधात कोणतंही वक्तव्य नको, अशा प्रकरणांवर येणाऱ्या काळात संपूर्ण समाजाला विचार करणे गरजेचे आहे. पाकिस्तानकडून जाणूनबुजून खोट्या अफवा पसरविल्या जातात. सीमेवर तणाव वाढविण्याचं काम केलं जातं असंही केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी शेहला रशीद हिने काश्मीरमधील परिस्थितीवरून केलेले आरोप भारतीय लष्कराने फेटाळून लावले होते.दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयामधील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी शेहरा रशीदविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच शेहला रशीद यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली होती.
शेहला रशीद ही स्वत: काश्मिरी असून, श्रीनगर येथील रहिवासी आहे. केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून ती सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, रविवारी शेहला हिने एकापाठोपाठ एक खोटे ट्विट करून काश्मीरमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा केला होता. तसेच लष्कर आणि पोलीस घरांमध्ये घुसून स्थानिकांना त्रास देत आहेत. तसेच शोपियाँ येथे लष्कराने काही जणांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्रास दिल्याचा आरोप शेहला रशीद यांनी केला होता. मात्र हे आरोप लष्कराने तात्काळ फेटाळून लावले आहेत.