नवी दिल्ली - केंद्र सरकारने घेतलेल्या जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटविण्याच्या निर्णयाबाबत काँग्रेस अद्यापही संभ्रमात दिसत आहे. काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला असून काँग्रेसचे काही नेते याचे समर्थनही करत आहेत. त्यामुळे या निर्णयाबाबत विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसने दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला काँग्रेसचे महासचिव, प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते हजर राहणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते राहुल गांधींनी मोदी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांनी कलम 370 हटविल्याचे स्वागत केले आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि हरयाणातील काँग्रेसचे युवा नेते दिपेंद्रसिंह हुड्डा यांनीही कलम 370 हटविल्याबद्दल मोदी सरकारचे समर्थन केले आहे. राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले आहे. त्यातच शिंदे यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे, त्यामुळे आगामी राजकारणातील बदलती दिशा आणि काँग्रेस विचारधारा यांकडे हा इशारा तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो. जेष्ठ पत्रकार दिनेश गुप्ता यांनी शिंदेंच्या समर्थनाला एक विचारपूर्वक केलेली योजना असल्याचं म्हटलं आहे. शिंदे हे कुठल्याही विषयांवर स्वत:चे मत मांडत नाहीत. मात्र, त्यांनी या विषयावर मत मांडले असून विचारपूर्वक आणि नितीचा वापर करत आपले समर्थन दर्शवले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांचे समर्थन काँग्रेसच्या बदलत्या विचारप्रणालीकडे इशारा करत आहे. कारण, लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसचे युवा नेतृत्व जनमताचा आदर करत आपले समर्थन देत असल्याचे दिसून येते, असेही गुप्ता यांनी म्हटले आहे.
अल्पसंख्यांक वर्ग हा काँग्रेसचा हक्काचा मतदार होता, पण सद्यस्थितीत अल्पसंख्याक मतदारही काँग्रेसपासून दुरावत आहे. त्यामुळेच, सद्यपरिस्थितीत काँग्रेस कुठलाही धोका पत्करु शकत नसल्यानेच काँग्रेसचे युवा नेतृत्व या विधेयकाचे समर्थन करत आहेत. दरम्यान, ज्या राज्यातील काँग्रेसच्या युवा नेतृत्वाने या 370 कलम हटविण्याच्या विधेयकाचे समर्थन केले आहे, त्या राज्यात आगामी दिवसांत विधानसभा निवडणुका होत आहेत. तर, भाजपाही 370 चा मुद्दा उपस्थित करत या राज्यातील निवडणुकांमध्येसरशी साधण्याचा प्रयत्न करणार आहे.