छोट्याशा विश्रांतीनंतर राहुल गांधी त्यांच्या महत्त्वाकांक्षी भारत जोडो यात्रेवर पुन्हा एकदा निघाले आहेत. कन्याकुमारीपासून काश्मीरकडे निघालेले राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. मात्र राहुल गांधींना ज्याप्रकारे दक्षिण भारतात विरोधी आणि मित्र पक्षांची साथ मिळाली त्याप्रमाणे उत्तर भारतात मात्र त्यांना साथ मिळताना दिसलेली नाही. उत्तर भारतामध्ये काँग्रेसच्या मित्रपक्षांचे नेते राहुल गांधींच्या या यात्रेपासून चार हात दूर राहताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षांमधील अखिलेश यादव आणि मायावतींसह सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण पाठवले होते. तसेच बिहारमधील जेडीयू आणि आरजेडीसह सर्व पक्षांना निमंत्रितकेले होते. मात्र उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कुठल्याही मोठ्या पक्षाचा बडा नेता भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होताना दिसत नाही आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर भारत जोडो यात्रा ही काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. तर लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीनेही या यात्रेत सहभागी होण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
त्यामुळे हिंदी पट्ट्यामधील राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आणि काँग्रेसचे मित्रपक्ष राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेपासून चार हात दूर का राहत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची प्रतिमा सशक्त नेता म्हणून समोर येत आहे. त्यामुळे भाजपासह सर्व विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. हे पक्ष काँग्रेसच्या कोअर मतदाराला आपल्याकडो ओढून तिथे मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते त्या त्या राज्यांमध्ये काँग्रेसला पुन्हा पाय रोवू देऊ इच्छित नाहीत.
उत्तर प्रदेशामध्ये सपा, बसपा, आरएलडी एकेकाळच्या व्होटबँकेच्या मदतीने राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेपर्यंत पोहोचले आहेत. तर बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू आणि डाव्या पक्षांनाही याच व्होटबँकेचा आधार आहे. मात्रा आता भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे ही व्होटबँक पुन्हा काँग्रेसकडे सरकेल. अशी या पक्षांना भीती आहे.
काँग्रेस हाच एकमात्र असा पक्ष आहे जो संपूर्ण देशात प्रत्येक ठिकाणी पसरलेला आहे. केंद्रात स्पष्ट बहुमतासह दोन वेळा सरकार स्थापन केल्यानंतरही भाजपाला अजून देशातील काही भागात आपला प्रभाव निर्माण करता आलेला नाही. एवढ्या कमकुवत स्थितीतही काँग्रेसला जगभरातून मते मिळतात. तसेच देशातील कानाकोपऱ्यातून त्यांचे आमदार निवडून येतात.
दरम्यान, २०२४ मध्ये मोदींसमोर विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून उबे राहण्यासाठी नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, केसीआर, ममता बॅनर्जी आदी नेते प्रयत्नशील आहेत. ममता बॅनर्जी आणि केसीआर कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला विरोधी गटाचं नेतृत्व करू देणार नाहीत. तर अखिलेश आणि मायावती यांनीही आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत. त्यामुळे हे सर्व पक्ष भारत जोडो यात्रेपासून दूर आहेत.