केंद्रातील सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारमधील रस्ते, महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामाची छाप पाडलेली आहे. गडकरींच्या नेतृत्वात देशभरात रस्तेबांधणींचं काम युद्धपातळीवर झालं आहे. दरम्यान, आज न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीच्या चौपाल या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी रस्तेबांधणीच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांचा उल्लेख केला. तसेच एकदा रस्त्यासाठी सासऱ्यांचं घर तोडण्याचा प्रसंग कसा आला याचा किस्सा सांगितला आहे.
या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी विविध मुद्यांवर आपलं मत मांडलं. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात असताना बुलडोझर खूप चालायचा आणि तुमचं खातंही खूप बुलडोझर चालवायचं, अशी विचारणा केली असता नितीन गडकरी यांनी सांगितलं की, हो मी बुलडोझर चालवलाय. तुम्ही नागपूरला आलात तर पाहाल की, नागपूरमधील सर्व रस्ते रुंद आणि प्रशस्त झालेले आहेत. माझा अनुभव आहे की, घर तोडल्यामुळे लोकांचा पाठिंबा जास्त मिळतो. त्यावर कुठलं असं घर तोडलंय का की ज्यात तुमचं नुकसान झालंय, असं विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले की, मी माझ्या सासऱ्याचं घर तोडलं होतं. तेव्हा एक नवीनच महिला आएएस अधिकारी आल्या होत्या. मी त्यांना सांगितलं होतं की, एक चुन्याची रेषा आखा आणि त्याच्या मध्ये येणारी सर्व घरे तोडा. मग पक्ष वगैरे बघू नका, सर्व बांधकामे तोडून टाका. मग काय त्यांनी माझा आदेश पाळला आणि माझ्या सासऱ्यांचं घरही तोडून टाकलं.
मात्र माझ्या सासऱ्यांचं घर मध्ये येत असल्याने ते घर तोडण्याआधी त्यांनी मला कल्पना दिली होती. मात्र मी म्हणालो की, मी तुम्हाला काय सांगितलंय एक चुन्याची रेषा मारा आणि त्याच्या मधील सगळी बांधकामं तोडा. त्यांनी माझ्या आदेशाचं पालन केलं. हे काम कुठल्याही सुडबुद्धीनं केलं नाही. त्यानंतर माझी पत्नी मला म्हणाली की, तुम्ही आधी कल्पना दिली असती तर आम्हीच घर तोडलं असतं. तुम्ही कल्पनाही दिली नाही. हे लोकहिताच्या भावनेतून केलेलं काम होतं. त्यामुळे लोकांनाही आवडलं, असेही गडकरी यांनी सांगितलं.