नवी दिल्ली - केंद्रीय पर्यावरणमंत्रीप्रकाश जावडेकर यांनी 18 वर्षीय नंदिनी दीक्षितचं कौतुक करत तिच्या कार्याची दखल घेतली आहे. जावडेकर यांनी नंदीनीचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला असून या तरुणाईच्या कामाचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय. नंदिनी ही छत्तीसगडमधील केवळ 18 वर्षांची विद्यार्थीनी आहे. आपल्या शिक्षणासोबतच पर्यावरणाच्या विकासासाठी ती कार्य करते.
नंदिनीने 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत शहीद जवानांच्या आठवणीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. नंदीनी सोशल मीडियातही एक्टीव्ह असून #एक पेड शहीदों के नाम या नावाने तिने आठवड्याची मोहीम सुरु केली आहे. नंदिनीच्या या पर्यावरणवादी विचाराचं आणि संकल्पनेचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळेच, पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही नंदिनीचा फोटो शेअर करत तिच्या कामाचं कौतुक केलंय. तसेच, आपल्या देशाची तरुणाई पर्यावरणाच्या दृष्टीने विचारपूर्वक आणि विकासात्मक क्रिएटीव्ह काम करत असल्याचा मला अभिमान वाटतो. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवांनांची आठवण ठेऊन पर्यावरण विकासासाठी वृक्षारोपण या संकल्पनेचंही जावडेकर यांनी कौतुक केलंय.