नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊननंतर काय यावर चर्चा करताना राज्यांनी कोणती काळजी घ्यावी यावरही सूचना केल्या. हळू हळू परंतू प्रत्यक्षात विविध भागात आर्थिक व्यवहार सुरु झाले आहेत. भविष्यात यामध्ये वेग येईल अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली. यावेळी, मोदींना काही मुख्यमंत्र्यांनी सूचनाही मांडल्या आहेत. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांनी लॉकडाऊनवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यामुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची सोय करण्यात येत आहे. मात्र, कोरानापासून गावांना लांब ठेवण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार असल्याचे मोदी म्हणाले. तसेच सहा फूट अंतर ठेवणे कमी झाले तर फार मोठे संकट उभे राहिल अशी भीतीही मोदींनी व्यक्त केली. आपल्याला आता हे समजून घ्यावे लागेल की, कोरोनासोबतची लढाई आता जास्त स्पष्ट असेल. पुढे आपल्याला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे, असेही मोदी म्हणाले. कोरोनाविरोधात लढण्यात भारताला यश मिळाले आहे. जगभरातून याची दखल घेतली गेली आहे. हे यश राज्यांचेही असल्याचे मोदी म्हणाले. मात्र, लॉकडाऊनच्या शिथिलतेवरुन ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.
भारत सरकारने जर सर्वकाही खुलंच केलं आहे, तर लॉकडाऊन वाढविण्यात अर्थ काय? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. देशाच्या, राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. रेल्वेसेवा सुरु झाली आहे, विमानसेवाही सुरु करण्यात आली आहे. तर, यापुढे लॉकडाऊन वाढविण्यात अर्थ काय? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत झालेल्या बैठकीत ममता यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोनमध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसेच मजुरांची ने-आण करताना कोरोनाचा प्रसार होणार नाही त्याची त्या राज्यांनी काळजी घ्यावी, असेही ठाकरे यांनी सांगितले.