मुंबई - देशात कोरोना संकाटाचा सामना करताना अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागत आहे. कोरोना काळात रुग्णांची मोठी गैरसोय होताना दिसत असून बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शनसाठीही नातवाईकांची धावपळ होत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमेडेसीवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. डॉक्टरांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन लिहून देण्यात येत आहे. मात्र, बाजारात ते इंजेक्शनच उपलब्ध होत नाही. यावरुन, अभिनेता सोनू सूदने साधा आणि सरळ प्रश्न विचारला आहे.
जर प्रत्येकाला माहिती आहे, की एखादं इंजेक्शन बाजारात उपलब्धच होत नाही. मग, प्रत्येक डॉक्टर केवळ तेच इंजेक्शनची मागणी का करतात, तेच इंजेक्शन का लिहून दिले जात आहे, असा सवाल अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे. जर रुग्णालयाला ते इंजेक्शन मिळत नसेल, तर सर्वसामान्य माणसांना कसे मिळेल. त्या इंजेक्शनला पर्यायी मेडिसीन का उपलब्ध होत नाही, ज्यामुळे लोकांचे प्राण वाचतील, असेही सोनू सूदने म्हटले आहे.
कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्टरांकडून रेमडेसीवीर इंजेक्शनची लिहून देण्यात येते. मात्र, बाजारात ते इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यातच, इंजेक्शनची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात काळाबाजारही झाल्याचे पाहायला मिळाले. 2 इंजेक्शन तब्बल 70 हजार रुपयांना विक्री केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे, सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. नातवाईकांना मनस्ताप करावा लागत असून धावपळही होत आहे. मात्र, आता हे इंजेक्शन कोरोनावरील उपचार पद्धतीतून हटविण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रेमडेसीवीर इंजेक्शन हटविण्याची शक्यता
कोरोना रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा पद्धतीचा वापर बंद करण्याच्या सूचविण्यात आले आहे. त्यानंतर, आता रेमडेसीवीर इंजेक्शनचाही वापर कोरोनाबाधित व्यक्तींच्या उपचारपद्धतीतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. कोविड 19 च्या रुग्णांवर उपचार करताना रेमेडेसीवीर इंजेक्शनचा मोठा फायदा झाल्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे, लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे डॉ. डीए. राना यांनी म्हटले आहे. डॉ. डीएस. राणा हे गंगाराम हॉस्पीटलचे प्रमुख असून प्लाझ्मा उपचारपद्धतीनंतर वगळण्यात आल्यानंतर रेमडेसीवीरबाबत त्यांनी हे विधान केलं आहे.
प्लाझ्मा पद्धती वगळण्यात आली
कोविड 19 संबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR),नॅशनल टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीपासून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये याचा अयोग्यपद्धतीने वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.