ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 8 - एका कन्नड रिअॅलिटी शोमध्ये भजन गायल्यामुळे एका मुस्लिम गायिकेला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. चांगला आवाज आणि सूर पक्का असल्याने कार्यक्रमात एकीकडे परिक्षकांनी तिचं कौतुक केलं असताना सोशल मीडियावरील काहीजणांनी तिला ट्रोल करत टार्गेट केलं आहे.
शिमोगा येथे राहत असलेल्या या 22 वर्षीय तरुण गायिकेचं नाव सुहाना सईद असं आहे. एक उत्तम गायिका असल्याने कार्यक्रमातील परिक्षकांनी तिचं तोंडभरुन कौतुक केलं. दुसरीकडे सोशल मीडियावर तिचं कौतुक करण्याऐवजी काही जणांनी मुस्लिम असून हिंदू भजन गायल्याने प्रश्न विचारत टीका केली आहे.
फेसबूकवर अनेकांनी सुहानावर टीका करताना तिने पुरुषांसमोर गाणं गाऊन मुस्लिम समाजाचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे सुहानाला ट्रोल केलं जाण्यावरुन कन्नडमधील एका संगीत दिग्दर्शकाने तिचं समर्थन करताना म्हटलं की, 'सुहाना तुमचा आवाज खूप चांगला असून तुम्ही खूप चांगल्या गायलात. एक हिंदू गाणं गाऊन तुम्ही सर्वासमोर उदाहरण ठेवलं आहे'. या संपुर्ण घटनेवर सुहानाने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. एकीकडे सोशल मीडियावर अनेकजण उपदेशाचे डोस पाजत बिनकामाचे सल्ले देत असताना अनेकांनी तिला पाठिंबाही दर्शवला आहे.