ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला देशाला संबोधित करणार आहेत. गेल्यावेळी 8 नोव्हेंबर रोजी जेव्हा पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं होतं तेव्हा नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून लोकांनी एटीएम आणि बँकांबाहेर रांगा लावल्या आहेत. महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी निर्णय जाहीर केल्यानंतर लोकांना 50 दिवस कळ सोसा असं आवाहन केलं होतं. हे 50 दिवस संपत असताना आता मोदी पुन्हा देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीवरच काही बोलणार आहेत की एखाद्या नवीन निर्णयाची घोषणा करणार आहेत याचा धसकाच सर्वांनी घेतला आहे. ट्विटरसह सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट फिरत आहेत.