नवी दिल्ली - ट्विटरने आपल्या साईटवरील भारताचा चुकीचा नकाशा हटवला आहे. आधी ट्विटरने आपल्या वेबसाइटवर टाकलेल्या नकाशात लडाख आणि जम्मू काश्मीर वेगळे देश म्हणून दर्शवले होते. ट्विटरच्या या कृत्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेतली होती आणि कारवाईसाठी तथ्य एकत्रित करण्याचे आदेशही दिले होते. यानंत दबाव वाढत असल्याने ट्विटरला चुकीचा नकाशा हटवावा लागला आहे. (Social media platform twitter remove wrong map of india)
चुकीचा नकाशा दाखविणे हा भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघण होते. यावर सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता. ट्विटरकडून एका ट्विटमध्ये फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यात भारताचा नकाशाही दाखवला आहे. त्याशिवाय आणखी काही देशांचे नकाशे आहेत. परंतु कोणतेही नकाशे चुकीचे नाहीत. केवळ भारताच्या नकाशासोबतच ट्विटरवर फेरफार करण्यात आली आहे. भारताच्या नकाशात देशाचे शीर म्हणून ओळखले जाणारे जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळा देश असल्याचे ट्विटरने दाखवले आहे. ट्विटरच्या या प्रकाराची सरकारकडूनही दखल घेण्यात आली आहे.ट्विटरने कुठे दाखवला होता हा नकाशा - ट्विटरच्या वेबसाइटवर एक करिअर नावाचे पेज आहे. यातच त्यांनी त्यांचे अधिकारी कोठे-कोठे कार्यरत आहेत, हे दाखवले होते. यात भारतात तीन ठिकाणं दर्शविण्यात आली आहेत. यात दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे. यातच हा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे.
पहिल्यांदाच चूक नाही, सात महिन्यात पुन्हा घडला प्रकार -पहिल्यांदाच ट्विटरकडून अशाप्रकारचे कृत्य झाले असे नाही, तर याआधीही 12 नोव्हेंबरला असे घडले होते. त्यावेळी लडाख हा चीनचा भाग असल्याचे ट्विटरने दाखविले होते. त्यावेळी सरकारकडून ट्विटरबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या. तेव्हा ट्विटरने लेखी स्वरुपात माफी मागितली होती. त्या माफीनाम्यात ट्विटरने म्हटले होते की, भविष्यात अशाप्रकारे चूक होणार नाही. परंतु सात महिन्याच्या कालावधीतच ट्विटरने भारताचा असा नकाशा दाखवून मोठी चूक केली.