Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट करणं आसाममधील १४ जणांना महागात पडलं आहे. तालिबानचं समर्थन केल्याबद्दल आसाममधील विविध ठिकाणांहून एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार अटकेच्या कारवाईला काल रात्रीपासून सुरुवात झाली होती. आरोपींविरोधात आयटी नियमांचं उल्लंघन आणि सीआरपीसीच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. (Social media post written in support of Taliban Assam Police arrested 14 people)
आसाम पोलिसांनी तालिबानी कारवायांचं समर्थन करत सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्या १४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष डीजीपी जीपी सिंह यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्वांनी भारतीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अफगाणिस्तानातील सध्याचं वातावरण पाहता तालिबान संदर्भात कोणतीही पोस्ट करण्याआधी सावधगिरी बागळण्याचं आवाहन देखील आसाम पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर पोलिसांची नजरसमाजात तेढ निर्माण होईल अशा सोशल मीडिया पोस्टकडे आसाम पोलिसांचं बारकाईनं लक्ष असल्याचंही एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कामरुप मेट्रोपोलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येक दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर दरांग, कछार, हैलाकांडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजई जिल्ह्यातून प्रत्येकी एका नागरिकाला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियात तालिबानला समर्थन करणाऱ्या टिपण्णी करणं महागात ठरू शकतं आणि अशा पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.